जुना वाद उफाळून आला; घरासमोर कुटुंबावर गोळीबार, तरुण गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2023 11:30 AM2023-07-26T11:30:23+5:302023-07-26T11:30:44+5:30
रांजणगावात मध्यरात्रीचा थरार; दोन आरोपी पसार
- मेहमूद शेख
वाळूजमहानगर: जुन्या वादाच्या कारणावरून एका 25 वर्षीय तरुणावर गोळी झाडल्याची थरारक घटना मंगळवारी रात्री 11.30 वाजेच्या सुमारास रांजणगाव शेनपुंजी येथे घडली. या घटनेत अर्जुन राजू काळे (25 रा. रांजणगाव) हा गंभीर जखमी झाला आहे.
रांजणगाव येथील अर्जुन काळे याची चुलत बहीण दीपाली ही चार-पाच वर्षांपूर्वी श्रावण सुरेश पिंपळे (रा.नायतळा, ता.निफाड, जि. नाशिक) याच्या सोबत पळून गेली होती. या घटनेनंतर काळे व पिंपळे कुटुंबीयात वाद सुरू होता. मंगळवारी रात्री 11.30 वाजेच्या सुमारास अर्जुन याचा भाऊ धरम यास श्रावण याने फोनवरून शिवीगाळ केली. या नंतर काळे कुटुंबीय घराबाहेर आले. काही वेळाने श्रावणने साथीदारांसह तिथे येऊन शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. वाद सुरू असताना अचानक श्रावणने गावठी पिस्तूल काढत त्यात गोळ्या भरू लागला.
हा प्रकार पाहताच घाबरलेल्या काळे कुटुंबीय दुकानाचे शटर बंद करून जिव वाचविण्यासाठी घरात पळाले. मात्र, श्रावणने शटरवर गोळी झाडली. गोळी शटरच्या आरपार जाऊन अर्जुन काळेच्या गुढग्यात घुसली. काळे कुटुंबीयांनी मदतीसाठी आरडाओरडा केला असता श्रावण पिंपळे व त्याचा साथीदार दुचाकीवरून पसार झाले. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी येऊन गोळीबारात जखमी अर्जुन काळे यास उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी आरोपींचा शोध सुरु आहे.