यशोधरा कॉलनीत जुन्याच ड्रेनेज लाइनमुळे जलवाहिनीला दुर्गंधीयुक्त पाणी; बदलण्यास मुहूर्त कधी?
By साहेबराव हिवराळे | Published: August 11, 2023 06:59 PM2023-08-11T18:59:08+5:302023-08-11T19:00:25+5:30
आरोग्याच्या तक्रारी वाढण्याची भीती; यशोधरा कॉलनीत सुरुवातीला टाकण्यात आलेली ड्रेनेज लाइन कमी व्यासाची व जीर्ण बनली आहे.
छत्रपती संभाजीनगर : यशोधरा कॉलनी व वैशालीनगरातील नागरिकांना ड्रेनेज चोकअपच्या त्रासाने डोकेदुखी व मळमळीचा त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यावर वाहणाऱ्या दुर्गंधीयुक्त पाण्यातून वाट शोधत घर गाठावे लागत आहे.
मनपा अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करणाऱ्यांना नवीन मोठ्या व्यासाची ड्रेनेजलाइन मंजूर असून लवकरच टाकू, असे गाजर दाखवले जाते; पण या कामाला मुहूर्त कधी लागणार, असे चार महिन्यांपासून आशावादी नागरिक विचारत आहेत.
मनपाचा कर नागरिक नियमितपणे आदा करतात; परंतु सेवासुविधांसाठी मनपाच्या दरबारी पायपीट करावी लागते. लोकप्रतिनिधींच्या निधीतून रस्त्याचे सिमेंटीकरण झाले, सामाजिक सभागृह, इ. कामे येथे करण्यात आलेली आहेत; परंतु ड्रेनेज लाइनचा प्रश्न रोगराई पसरवू शकतो, अशी भीती रहिवासी रघुनाथ गिमेकर, कमलाकर पगारे, निवृत्त मुख्याध्यापक साळवे यांनी व्यक्त केली.
जुनी ड्रेनेज लाइन बदला...
यशोधरा कॉलनीत सुरुवातीला टाकण्यात आलेली ड्रेनेज लाइन कमी व्यासाची व जीर्ण बनली आहे. महिन्यातून तीनदा ड्रेनेज सफाई कर्मचारी येऊन दुरुस्ती करतात; परंतु परिस्थितीत सुधारणा नाही.
- महेंद्र साळवे, रहिवासी
डासांमुळे आरोग्यास धोका...
अस्वच्छतेमुळे डासांचा त्रास सातत्याने होत असल्याने आरोग्यास धोका आहे. औषध व धूरफवारणी कर्मचारी चुकूनही या परिसरात फिरकत नसल्याने थंडीतापाचे रुग्ण आढळून येतात. परिसराकडे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन प्रश्न सोडवावेत.
- बाळासाहेब ठोंबरे, रहिवासी
उद्यानाची गरज
कॉलनीत उद्यानासाठी जागा असून, तेथे सामाजिक कार्यक्रम घेण्यात येतात. येथे उद्यान विकसित करावे, खेळणी बसवावीत.
- प्रा. रत्नाकर पगारे, रहिवासी