काळाचा घाला ! वृद्ध पित्याला द्यावा लागला तरुण मुलांच्या जनाजाला खांदा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2020 06:57 PM2020-08-01T18:57:01+5:302020-08-01T19:09:17+5:30
एकाच कुटुंबातील ३ मुलांचा करुण अंत झाल्याने शेख कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला.
करमाड : कोबी काढण्याच्या कामासाठी नाथनगर वडखा येथे गेलेल्या ५ तरुणांचा पाझर तलावात बुडून शुक्रवारी मृत्यू झाल्याचे कळताच भालगावात शोककळा पसरली होती. वृद्ध पित्याला आपल्या तरुण मुलांच्या जनाजाला खांदा देण्याची वेळ आल्याचे दृश्य पाहून गावातील नागरिकांनी हळहळ व्यक्त केली.
एकाच कुटुंबातील ३ मुलांचा करुण अंत झाल्याने शेख कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. या मृत तरुणाचे वडील युसूफ शेख हे टेम्पोचालक असून, पत्नी व ५ मुलांसह भालगाव येथे राहतात. टेम्पो चालवून ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते, तर इतर दोन्ही मृतांना प्रत्येकी एक भाऊ आहे. सध्या लॉकडाऊन काळात शाळा, महाविद्यालये बंद असल्याने व बकरी ईदनिमित्त कुटुंबाला आर्थिक हातभार लावण्यासाठी पाचही तरुण कोबी काढण्याच्या कामासाठी शुक्रवारी नाथनगर वडखा येथे गेले आणि तलावात त्यांचा बुडून मृत्यू झाला. मृत्यू झालेल्या मुलांच्या कुटुंबातील सदस्यांनी केलेल्या आक्रोशामुळे गावातील सर्वांचेच हृदय हेलावले. या दुर्दैवी घटनेबद्दल आ. हरिभाऊ बागडे यांनीही दु:ख व्यक्त केले आहे. याबाबत चिकलठाणा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आल्याचे पोलीस निरीक्षक महेश आंधळे यांनी सांगितले.
मृतांपैकी चार जण महाविद्यालयीन विद्यार्थी
मृतांपैकी चार मुले हे चित्तेपिंपळगाव येथील स्वामी विवेकानंद विद्यालयाचे विद्यार्थी आहेत. शेख समीर व शेख अन्सार हे याचवर्षी बारावी उत्तीर्ण झाले आहेत. सोहेल युसूफही दोन दिवसांपूर्वी जाहीर झालेल्या दहावी परीक्षेच्या निकालात चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाला होता, तर अतिक हाही याच विद्यालयाचा माजी विद्यार्थी असून, सध्या त्याचे महाविद्यालयीन शिक्षण सुरू होते.