स्वस्त धान्य दुकानांत जुन्या पद्धतीनेच धान्य वाटप
By Admin | Published: May 20, 2017 12:48 AM2017-05-20T00:48:08+5:302017-05-20T00:49:55+5:30
जालना: अद्याप अनेक दुकानांमधून ई-पॉस ऐवजी पारंपरिक पद्धतीनेच धान्य वितरण होत असल्याचे चित्र आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना: जिल्ह्यातील रेशन धान्य दुकानदारांनी लाभार्थींना ई-पॉस मशिनद्वारेच धान्य वाटप करण्याचे जिल्हापुरवठा विभागाने कडक आदेश दिले असले तरी अद्याप अनेक दुकानांमधून ई-पॉस ऐवजी पारंपरिक पद्धतीनेच धान्य वितरण होत असल्याचे चित्र आहे. प्रत्येक दुकानदारांकडे मशिन असली तरी तांत्रिक दोष सांगून वापर बंद असल्याचे शुक्रवारी आठ ते दहा स्वस्तधान्य दुकानांत केलेल्या स्टिंग आॅपरेशनमधून दिसून आले.
जालना तालुक्यात २०९ स्वस्तधान्य दुकाने असून, पैकी शंभरपेक्षा अधिक दुकाने शहरात आहेत. शुक्रवारी काही दुकानांमध्ये पाहणी केली असता ईपॉसचा वापराकडे कानाडोळा अथवा त्याचा वापर मर्यादित होत असल्याचे चित्र आहे. प्रत्येक दुकानदाराने प्रत्येक लाभार्थीला ईपॉसद्वारेच धान्य वाटप करण्याचे आदेश आहेत. सर्व दुकानदारांना ईपॉस मशिन देऊन प्रशिक्षणही दिले आहे.
शहरातील दुकानांमधून तीस ते चाळीस टक्के धान्य ईपॉसद्वारे तर साठ टक्के धान्य जुन्या पद्धतीनेच वितरित होत आहे. त्यामुळे ईपॉसचा वापर होतो का बंद पडतो, असा प्रश्न आहे. प्रत्येक दुकनदाराकडे शंभर ते सव्वाशे लाभार्थी जोडलेले आहेत.
शुक्रवारी विविध दुकानांतून धान्याचे वितरण सुरू होते. मात्र ईपॉसचा वापर मर्यादित दिसून आला. ईपॉस वापराबाबत अनेक दुकानदारांना साशंकता असल्याचे या स्टिंग आॅपरेशमधून स्पष्ट झाले. ईपॉस मशिन वापराकडे स्वस्तधान्य दुकानदार टाळाटाळ करीत आहेत. परिणामी धान्याची नोंद अथवा किती धान्य वाटप झाले याचा मेळ लागत
नाही.