उड्डाण पुलाखाली राहणाऱ्या वृद्धेला मिळाला पोलिसांच्या प्रयत्नामुळे वृद्धाश्रमात निवारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:05 AM2021-07-21T04:05:02+5:302021-07-21T04:05:02+5:30
बुलडाणा जिल्ह्यातील भादुला येथील रहिवासी ७० वर्षीय वृद्धेला अपत्य नाही. पतीचे निधन झाल्यापासून ती बहिणीच्या नातीसोबत राहत ...
बुलडाणा जिल्ह्यातील भादुला येथील रहिवासी ७० वर्षीय वृद्धेला अपत्य नाही. पतीचे निधन झाल्यापासून ती बहिणीच्या नातीसोबत राहत होती. मात्र त्यांनाही ती नकोशी झाल्याने त्यांनी तिला घरातून हाकलून दिले. १५ दिवसांपूर्वी ती औरंगाबादला आली व पुलाचा आसरा घेतला. या पुलाखाली दारूडे रात्री पित बसतात. या म्हातारीला पाहून ते घाणेरडे बोलत. यामुळे आजीबाई जीव मुठीत धरून राहत होती. परिसरातील धुणी-भांडी करणाऱ्या महिलांनी चार दिवसांपूर्वी तिला पाहिले. तिची कर्मकहाणी ऐकूण तिला घरी नेले. तिची माहिती कम्युनिटी पोलिसिंग पथकाच्या हवालदार निर्मला निंभोरे यांना कळविली. निंभोरे आणि कर्मचाऱ्यांनी तिची भेट घेतली. तिला वृद्धाश्रमात ठेवण्यासाठी प्रयत्न करा, अशी विनंती वृद्धेचा सांभाळ करणाऱ्या महिलांनी केली. पोलीस उपायुक्त मीना मकवाना, पोलीस निरीक्षक किरण पाटील यांना ही बाब कळविली. त्यांनी आजीला मातोश्री वृद्धाश्रमात दाखल करण्यासाठी प्रक्रिया सुरू केली. दोन दिवसांपूर्वी तिची कोविड चाचणी करून आज आजीला मातोश्री वृद्धाश्रमात दाखल करण्यात आले. या आजीला वृद्धापकाळात निवारा मिळाल्याने तिने थरथरत्या हाताने पोलिसांना धन्यवाद दिले.
-----------------
चौकट
नऊवारी लुगडे दिल्याने डोळ्यात तरळले आनंदाश्रू
वृद्धेच्या अंगावरील लुगडे फाटले असल्याची माहिती पोलिसांनी शहरातील एका दानशूर महिलेला कळविली. तेव्हा त्यांनी क्षणाचाही विलंब न करता नऊवारी लुगडे आजीबाईला खरेदी करून दिले. हे लुगडे नेसल्यावर आजीबाईच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले.