वृद्धाचा दगडाने ठेचून खून; दोन दिवसांपूर्वी दवाखान्यात जाण्यासाठी म्हणून गेले होते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2021 07:30 PM2021-12-09T19:30:09+5:302021-12-09T19:31:24+5:30
बीड बायपास परिसरातील सहारा सिटीसमोर एक वृद्ध बेशुद्धावस्थेत पडल्याचे एका सुरक्षारक्षकाने पाहिले.
औरंगाबाद : बीड बायपास परिसरातील सहारा सिटीच्या समोरील भागात वृद्धाचा दगडाने ठेचून खून केल्याची घटना बुधवारी उघडकीस आली. बबन धुराजी शिंदे (वय ६५, रा. निपाणी भालगाव) असे मृताचे नाव असल्याची माहिती सिडको एमआयडीसी पोलिसांनी दिली.
एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्याचे निरीक्षक विठ्ठल पोटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, बीड बायपास परिसरातील सहारा सिटीसमोर एक वृद्ध बेशुद्धावस्थेत पडल्याचे एका सुरक्षारक्षकाने पाहिले. त्याच्या अंगावर मोठमोठ्या जखमा असल्यामुळे त्याने घटनेची माहिती एमआयडीसी सिडको पोलिसांना दिली. पोलिसांना मृताच्या खिशामध्ये आधार कार्ड सापडले. त्यानुसार ओळख पटली. हा प्रकार खुनाचा असल्यामुळे न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या पथकालाही पाचारण करण्यात आले. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी घाटीत पाठविण्यात आला. ही घटना २० तासांपूर्वी घडलेली असून, दुसऱ्या एखाद्या जागी मारहाण करून मृतदेह याठिकाणी आणून टाकलेला असू शकतो, अशी शक्यताही पोलीस अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. या प्रकरणी मृताचा मुलगा सुदाम शिंदे यांच्या तक्रारीवरून खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक शिवाजी चौरे करीत आहेत. घटनास्थळी पोलीस उपायुक्त दीपक गिऱ्हे, सहायक आयुक्त निशिकांत भुजबळ यांनी पाहणी केली.
चेहरा झालेला होता विद्रूप
बबन यांचा चेहरा मारहाण करून विद्रूप करण्यात आला होता. तसेच मृतदेहाशेजारी रक्ताने माखलेला मोठा दगडही आढळून आला आहे.
दोन दिवसांपूर्वी घरातून गेले
बबन शिंदे हे सोमवारी सकाळी मोठ्या मुलाकडून दवाखान्यासाठी दोन हजार रुपये घेऊन घराबाहेर पडले होते. त्यानंतर घरी परतलेच नाहीत, अशी माहिती मुलांनी दिल्याचे पोलिसांनी सांगितले. बबन यांना पत्नी, दोन मुले, सुना असा परिवार आहे. वडिलांना दारूचे व्यसन असल्यामुळे मुलांनीही ते परत आले नसल्याची माहिती घेतली नाही. मात्र, त्यांचा मृतदेहच सापडला.