जोडवाडीत भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या वृद्धाचा मारहाणीत मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 04:05 AM2021-01-17T04:05:46+5:302021-01-17T04:05:46+5:30
चित्तेपिंपळगाव : मुलासोबत सुरू असलेले भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. हरसिंग गुसिंगे असे मृताचे ...
चित्तेपिंपळगाव : मुलासोबत सुरू असलेले भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. हरसिंग गुसिंगे असे मृताचे नाव आहे. चिकलठाणा पोलिसांनी संजय उत्तम बिमरोट, बिजू निहालसिंग जारवाल यांना अटक केली आहे. चार जण पसार झाले आहेत.
हरसिंग गुसिंगे खूनप्रकरणी दोघांना अटक केल्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले. हल्लेखोरांना अटक करण्यासाठी ग्रामस्थांनी पोलीस ठाण्यात आंदोलन केले. आरोपींना अटक केल्याशिवाय अंत्यविधी न करण्याचा ग्रामस्थांनी पवित्रा घेतला होता.
चरणसिंग हरसिंग गुसिंगे (३१) यांच्या फिर्यादीवरून आरोपी संजय सत्तावन, संतोष गुसिंगे, मदन जारवाल, बिजू जारवाल, विजय सत्तावन, संजय उत्तम बिमरोट या सहा जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवारी सायंकाळी ६.३० वाजता पोलीस बंदोबस्तात अंत्यविधी पार पडला. शेतीचा वाद सुरू असून, निवडणुकीच्या रात्री हाणामारी झाल्याने त्यास राजकीय रंग देण्याचा प्रयत्न सुरू होता. निवडणूक शांततेत पार पडली असल्याने येथे कोणताही वाद झाला नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.