जुना मोंढा जिंकला, जाधववाडी हरली
By Admin | Published: July 14, 2015 12:33 AM2015-07-14T00:33:45+5:302015-07-14T00:33:45+5:30
औरंगाबाद : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत जुना मोंढा विरुद्ध जाधववाडी असा सामना रंगला. जुना मोंढ्यातील घाऊक बाजार वगळल्याने तेथील
औरंगाबाद : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत जुना मोंढा विरुद्ध जाधववाडी असा सामना रंगला. जुना मोंढ्यातील घाऊक बाजार वगळल्याने तेथील १६० व्यापाऱ्यांना मतदानाचा अधिकार नाकारला गेला. मात्र येथील व्यापाऱ्यांनी हा मुद्दा प्रतिष्ठेचा बनवत निवडणूक लढवून जाधववाडीतील व्यापाऱ्यांना चारीमुंड्या चीत करीत दोन्ही उमेदवारांना निवडून आणले. हा जुन्या मोंढ्यातील व्यापाऱ्यांचा सामूहिक विजय ठरला. यामुळे मोंढ्यात सोमवारी दिवाळी साजरी करण्यात आली.
जाधववाडीतील अडत व्यापारी संघटनेचे अध्यक्ष व माजी संचालक हरीश पवार व अडत व्यापारी संजय पहाडे या दोघांनी निवडणूक लढविली. जुन्या मोंढ्यातील व्यापाऱ्यांनी प्रशांत सोकिया व हरिशंकर दायमा या दोन व्यापाऱ्यांना मैदानात उतरविले. मतमोजणीत सुरुवातीपासून मोंढ्यातील दोन्ही उमेदवारांनी आघाडी कायम ठेवली. सोकिया यांनी ४४६ मते व दायमा यांनी ४२७ मते मिळवून विजय मिळविला. जाधववाडीतील कन्हैय्यालाल जैस्वाल यांना ३१३ मते तर संजय पहाडे यांना ३०५ मते मिळाली. जाधववाडीतील फळभाजीपाला अडत बाजारातील उमेदवार इसा खान यांनी चांगली लढत दिली. पण इलियास बागवान या उमेदवाराने १२६ मते ‘खाल्ल्याने’ इसा खान यांना ३०३ मते घेऊन पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले. अवघी २८७ मते मिळालेले हरीश पवार सहाव्या स्थानावर फेकले गेले. उल्लेखनीय म्हणजे जाधववाडीतील व्यवसायाचा परवाना नसल्याने जुन्या मोंढ्यातील १६० व्यापाऱ्यांना मतदान करता आले नाही. पण मोंढ्यातील व्यापाऱ्यांनी प्रचारात झोकून दिले. मिरवणूक जुन्या मोंढ्यात आली तेव्हा तासभर फटाक्यांची आतषबाजी सुरू होती. गुलालाची एवढी उधळण केली की, मोंढा गुलालमय झाला. मोंढ्यात खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी करण्यात आली. आम्हाला हरविण्याचा प्रयत्नच विरोधकांच्या अंगलट आला, स्थलांतराचा प्रश्न सोडविण्यापेक्षा राजकारण केले गेले, जाणूनबुजून त्रास दिला गेला, यास कंटाळून मोंढ्यातील व्यापाऱ्यांनी आपला उमेदवार निवडून आणला’, अशी प्रतिक्रिया व्यापारी व्यक्त करीत होते.