जुन्या वादातून पहिलवानावर प्राणघातक हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2019 10:23 PM2019-04-07T22:23:49+5:302019-04-07T22:24:06+5:30
जुन्या वादातून हर्सूल येथील व्यायामशाळेत घुसून पहिलवानावर प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची घटना ५ एप्रिल रोजी मध्यरात्रीनंतर ३ वाजेच्या सुमारास घडली.
औरंगाबाद : जुन्या वादातून हर्सूल येथील व्यायामशाळेत घुसून पहिलवानावर प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची घटना ५ एप्रिल रोजी मध्यरात्रीनंतर ३ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी हर्सूल पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला.
शेख नबी शेख करीम (वय ३२,रा. बदनापूर, जि. जालना), शुभम आधाने, वैभव जोग (वय२४,दोघे रा. पोखरी,ता. औरंगाबाद) आणि संजीव भुने (वय ४२,रा. शिवाजीनगर) अशी आरोपींची नावे आहेत. नसीम फरीद पटेल (वय २४,रा.हर्सूल) असे जखमी पहिलवानाचे नाव आहे. नसीम पटेल हे हर्सूल येथील हरिसिद्धी देवी परिसरातील कुस्ती तालीम चे प्रशिक्षण देतात. शिवाय त्यांची शेतीचा व्यवसाय आहे. काही दिवसांपूर्वी देवळाई येथे कुस्तीच्या खेळावरून भोनेसोबत त्यांचा किरकोळ वाद झाला होता. नंतर पुन्हा पठाणखेडा येथेही त्यांच्यात वाद झाला होता. मात्र,तेथील लोकांच्या मध्यस्थीने वाद आपसात मिटला होता.
५ एप्रिल रोजी रात्री ११ वाजता हरिसिद्धी व्यायाम शाळा येथे नसीम आणि तालीमसाठी आलेली मुले झोपली होती. यानंतर मध्यरात्रीनंतर ३ वाजेच्या सुमारास तालीम आखाड्याचा दरवाजा वाजविल्याने कृष्णा मांगे यांनी दार उघडले. यामुळे नसीम यांनाही जाग आली. यावेळी आत आलेल्या आरोपींनी अचानक नबीने नसीमच्या पोटात चाकू खुपसणार तोच नसीमने हा चाकू पायावर अडविला.
अन्य आरोपींनी लाकडी दांड्याने हल्ला चढविला आणि याला आज जिवंत सोडू नका, असे म्हणून मारहाण करण्यास सुरुवता केली. या वेळी तालीममध्ये झोपलेले अन्य तरूण झोपेतून उठले आणि राहुल कसाटे, राहुल दुधारे यांनी आरोपींना पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र ते तेथून पळून गेली. यात नसमी यांच्या पायाला मोठी जखम झाली. घटनेनंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. याविषयी नसीम यांनी दिलेल्या तक्रारीवरून हर्सूल पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा नोंदविला.