जुने, फाटलेले रेशन कार्ड जाणार, आता मोबाइलवर ठेवा ई-रेशन कार्ड !
By विकास राऊत | Published: August 18, 2023 07:00 PM2023-08-18T19:00:09+5:302023-08-18T19:01:50+5:30
सध्या अस्तित्त्वात असलेले रेशन कार्ड नागरिक ई-कार्डमध्ये रूपांतरित करून घेऊ शकतात.
छत्रपती संभाजीनगर : राज्य शासनाने ई - रेशन कार्ड देण्याबाबत निर्णय घेतला असून, त्यानुसार संगणकीय प्रणाली विकसित करण्यात आली आहे. प्रत्येक रेशन कार्डधारकांना आता ई - रेशन कार्ड मिळणार आहे.
सध्या अस्तित्त्वात असलेले रेशन कार्ड नागरिक ई-कार्डमध्ये रूपांतरित करून घेऊ शकतात. घरबसल्या ऑनलाइन ई-रेशन कार्डची प्रक्रिया पूर्ण करता येईल.
प्रत्येकाला मिळणार ई - रेशन कार्ड
सार्वजनिक वितरण व्यवस्थेत रेशन कार्डऐवजी ई - रेशन कार्ड लाभार्थींना ऑनलाइन काढता येईल. जुने, फाटलेले रेशन कार्ड नको असेल तर ऑनलाइन नोंदणी करून ई-रेशन कार्ड नागरिक घेऊ शकतील. नागरिकांना पाहिजे तेव्हा ऑनलाइन ते कार्ड ओपन करता येईल. प्रत्येकाला ई-रेशन कार्ड मिळणे शक्य आहे.
जिल्ह्यात कधीपासून मिळणार?
जिल्ह्यात ई-रेशन कार्ड देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. शासनाच्या संकेतस्थळावर (वेबसाइटवर) याबाबतची सर्व माहिती उपलब्ध आहे. ई-मेल, मोबाइल फोन आदींद्वारे पीडीएफ, फोटो स्वरूपात हे ई-रेशन कार्ड हव्या त्या ठिकाणी उपलब्ध होईल. ऑनलाइन असल्यामुळे कार्ड डाउनलोड करून प्रिंट काढणेही शक्य होईल.
जिल्ह्यात पाच लाख रेशन कार्डधारक
जिल्ह्यात ५ लाख ६३ हजार ४१७ रेशन कार्डधारक आहेत. यामध्ये अंत्योदय योजनेची ६६ हजार १०५, प्राधान्य कुटुंबांचे ४ लाख २४ हजार ६२४, तर शेतकरी कुटुंंब योजनेंतर्गत ७२ हजार ६८८ रेशन कार्डधारक आहेत.
नागरिक अर्ज करू शकतात
जिल्ह्यात ई-रेशन कार्डची सुविधा देण्यास सुरुवात झाली आहे. यासाठी शासनाच्या संकेतस्थळावरून अर्ज करता येईल. ई-रेशन कार्डबाबत शासनाचा अध्यादेश पुरवठा विभागाला प्राप्त झाला आहे. ज्या नागरिकांना ई-रेशन कार्ड हवे असेल ते ऑनलाइन माहिती भरून घेऊ शकतात.
- वर्षाराणी भोसले, जिल्हा पुरवठा अधिकारी