वृद्ध महिलेची सोन्याची पोत पळवली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:02 AM2021-01-23T04:02:16+5:302021-01-23T04:02:16+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क औरंगाबाद : साड्या वाटप सुरू असल्याची थाप मारुन एका भामट्याने महिलेच्या गळ्यातील ४० मण्यांची सोन्याची पोत ...
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : साड्या वाटप सुरू असल्याची थाप मारुन एका भामट्याने महिलेच्या गळ्यातील ४० मण्यांची सोन्याची पोत विश्वासघाताने लंपास केली. ही घटना शुक्रवारी सकाळी ११ वाजता नवा मोंढा जाधववाडी येथे घडली.
याविषयी प्राप्त माहिती अशी की, हर्सूल परिसरातील मजूर असलेल्या ६० वर्षीय गयाबाई महादू हिवराळे नेहमीप्रमाणे सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास कामावर जात होत्या. जाधववाडी येथे अनोळखी व्यक्तीने त्यांना गाठले. ‘पुढे काही अंतरावर गरीब महिलांना साड्या वाटप सुरू आहे, तुमच्या गळ्यातील सोन्याची पोत काढून ठेवली तर तुम्ही गरीब दिसाल आणि तुम्हाला साडी मिळेल’, अशी थाप त्याने मारली. यानंतर त्याने एक कागद त्यांच्यासमोर ठेवला. या कागदावर पोत ठेवा पुडी बांधा, असे तो म्हणाला. त्याच्यावर विश्वास ठेवून महिलेने गळ्यातील पोत कागदात ठेवली. ही पुडी त्या व्यक्तीने स्वत:कडेच ठेवली. त्यानंतर ‘तुम्ही येथेच थांबा मी साडी वाटप चालू आहे का पाहून येतो’, असे म्हणून तो निघून गेला. बराचवेळ झाल्यानंतरही तो माणूस परत आला नाही त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे हिवराळे यांच्या लक्षात आले. सिडको पोलीस ठाण्यात उपनिरीक्षक प्रतिभा आबुज यांनी त्यांची तक्रार नोंदवून घेतली. पोलीस उपनिरीक्षक शिंदे आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जात आरोपीचा शोध घेतला. मात्र, आरोपी सापडला नाही.
चौकट...
संशयित सीसीटीव्ही कॅमेरात कैद
वृद्ध महिलेला लुटणारा संशयित आरोपी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याचे दिसून आले. पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला आहे.