सर्वात जुनी क्रांतीचौक पोलीस कॉलनी पाडणार; उभी राहणार ७८० घरांची मल्टिस्टोरेज अपार्टमेंट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2021 11:52 AM2021-08-16T11:52:00+5:302021-08-16T11:55:37+5:30
Kranti Chowk police colony : औरंगाबाद शहर पोलीस आयुक्तालयात सुमारे साडेतीन हजार पोलीस अधिकारी, कर्मचारी आहेत. राज्यातील पोलीस अधिकारी, कर्मचारी यांच्यासाठी दोन टप्प्यांत घरांचे बांधकाम करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता.
औरंगाबाद : शहरातील सर्वांत जुन्या पोलीस वसाहतीपैकी एक असलेली क्रांतीचौक पोलीस कॉलनी ( Kranti Chowk police ) पाडून तेथे ७८० घरांची नवीन मल्टीस्टोरेज अपार्टमेंटचे बांधकाम केले जाणार आहे. याविषयीचा प्रस्ताव तीन वर्षांपूर्वी पोलीस आयुक्तालयातर्फे पोलीस महासंचालक कार्यालयास पाठविण्यात आला होता. हा प्रस्ताव आता शासनस्तरावर मंजुरीसाठी असल्याचे सूत्रांनी सांगितले. ( The oldest Kranti Chowk police colony will be demolished; Multistorage apartments of 780 houses will be built )
औरंगाबाद शहर पोलीस आयुक्तालयात सुमारे साडेतीन हजार पोलीस अधिकारी, कर्मचारी आहेत. राज्यातील पोलीस अधिकारी, कर्मचारी यांच्यासाठी दोन टप्प्यांत घरांचे बांधकाम करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. पहिल्या टप्प्यांतर्गत शहर पोलीस आयुक्तालयाच्या आवारातच पोलीस आयुक्त, उपायुक्तांचे बंगले आणि ५८० घरांच्या पोलीस कॉलनीचे बांधकाम झाले. शिवाय पोलीस आयुक्तालयाची टोलेजंग इमारत बांधण्यात आली. दुसऱ्या टप्प्यात क्रांतीचौक पोलीस वसाहतीच्या जागेवर ७८० घरांचा प्रस्ताव शहर पोलीस प्रशासनाकडून पोलीस महासंचालक कार्यालयास पाठविण्यात आला होता. तेथून हा प्रस्ताव शासनामार्फत पोलीस गृहनिर्माण महामंडळाकडे गेला आहे. दरम्यान, शहरात रूजू होणाऱ्या पोलीस अधिकारी यांच्यासाठी निवासस्थानाचा तुटवडा असल्याची बाब लक्षात घेऊन तीसगाव येथे ६४ कर्मचाऱ्यांसाठी म्हाडाकडून घरे खरेदी करण्यात आली. सध्या शहर पोलीस आयुक्तालयाशेजारी ६०० निवासस्थाने आहेत. सिडको पोलीस कॉलनीत ६०० घरे आहेत. सिडको पोलीस कॉलनीतील अनेक निवासस्थाने राहण्यायोग्य नाहीत. यामुळे अनेकांनी घरे सोडली आहेत.
शहर पोलीस आयुक्तालय परिसरातील पोलीस कॉलनीतील नवीन घरांचे पोलीस प्रशासनाला हस्तांतरण झाल्यानंतर निवासस्थान मिळावे, याकरिता ९०० पोलीस कर्मचाऱ्यांनी प्रशासनाकडे अर्ज केले होते. या सर्व अर्जांची प्रतीक्षा यादी तयार करून प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर प्रशासनाने त्यांना घरांचे वाटप केले होते. मात्र, सर्वच अर्जदारांसाठी घरे उपलब्ध झाली नाही. यामुळे अनेक अधिकारी, कर्मचारी भाड्याने घर घेऊन राहत आहेत. पोलिसांच्या घराची मागणी लक्षात घेऊन शहर पोलीस प्रशासनाने क्रांतीचौक पोलीस कॉलनीतील जुनी घरे पाडून तेथे ७८० घरांची नवीन पोलीस वसाहत उभारण्याचा प्रस्ताव शासनास पाठविला होता. हा प्रस्ताव पोलीस गृहनिर्माण महामंडळाकडे प्रलंबित आहे. या प्रस्तावापूर्वी महामंडळाला अन्य जिल्हे आणि शहरांकडून पोलीस कर्मचारी निवासस्थान उभारण्यासाठी प्रस्ताव प्राप्त झाले होते. क्रांतीचौक पोलीस वसाहतीचा प्रस्ताव दुसऱ्या टप्प्यातील आहे. अजून अनेक जिल्ह्यांतील पहिल्या टप्प्यातील घरांची मागणी पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील प्रस्तावावर शासन विचार करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
पोलीस अधिकारी, कर्मचारी यांच्यासाठी शहरात असलेली
शहर पोलीस आयुक्तालय परिसरातील घरांची संख्या - ६००
सिडको पोलीस कॉलनीतील निवासस्थाने - ६००
तीसगाव येथील म्हाडा कॉलनी - ६४