कबीरनगर आरोग्य केंद्रात चोरट्यांची ओली पार्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:03 AM2021-06-10T04:03:52+5:302021-06-10T04:03:52+5:30
औरंगाबाद : उस्मानपुरा परिसरातील कबीरनगर येथील महापालिकेच्या आरोग्य केंद्रात दोन दिवसांपूर्वी चोरट्यांनी चक्क ओली पार्टी केल्याचे बुधवारी उघडकीस आले. ...
औरंगाबाद : उस्मानपुरा परिसरातील कबीरनगर येथील महापालिकेच्या आरोग्य केंद्रात दोन दिवसांपूर्वी चोरट्यांनी चक्क ओली पार्टी केल्याचे बुधवारी उघडकीस आले. चोरट्यांनी जाता जाता आरोग्य केंद्रातील छोट्यामोठ्या वस्तूही लांबविल्या. घटनेची माहिती मिळतात अतिरिक्त आयुक्त बी. बी. नेमाने, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी आरोग्य केंद्राला भेट दिली.
कबीरनगरात महापालिकेने दोन वर्षांपूर्वी नव्यानेच केंद्र शासनाकडून प्राप्त निधीतून आरोग्य केंद्र बांधले. बांधकाम पूर्ण झाल्यापासून ते बंदच होते. त्याचा वापर केला जात नव्हता. बंद असलेल्या आरोग्य केंद्राचा वापर काही टवाळखोर गैरकृत्यांसाठी करीत होते, पण त्याची माहिती इतके दिवस पालिका प्रशासनाला नव्हती. दोन दिवसांपूर्वी या आरोग्य केंद्रात चोरी झाली आणि त्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाला कळाली. बुधवारी अतिरिक्त आयुक्त बी.बी. नेमाने व आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी आरोग्य केंद्राला भेट दिली तेव्हा आरोग्य केंद्राचा दरवाजा तोडण्यात आल्याचे लक्षात आले. आरोग्य केंद्रात काही किरकोळ साहित्य ठेवण्यात आले होते, त्याची चोरी झाल्याचे स्पष्ट झाले. खिडकीचे ग्रील्स, नळाच्या तोट्यादेखील चोरीला गेल्या. मागील काही दिवसांपासून आरोग्य केंद्रात ओल्या पार्ट्यादेखील केल्याचे स्पष्ट झाले. आरोग्य केंद्राच्या परिसरात सुरक्षारक्षक तैनात करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला.
चौकट..
आठ दिवसांत ओपीडी
कबीरनगरातील आरोग्य केंद्र एक-दीड वर्षापूर्वी बांधण्यात आले आहे, पण कोरोना काळामुळे ते सुरू करण्यात आले नव्हते. त्याचा गैरफायदा काही मंडळींनी घेतला. आरोग्य केंद्राची दारे, खिडक्या तोडण्यात आल्या आहेत. काही साहित्याचीदेखील चोरी झाल्याचे लक्षात आले आहे. त्यामुळे येत्या आठ दिवसात ते आरोग्य केंद्र सुरू करून तेथे ओपीडीची व्यवस्था केली जाणार आहे. दोन सुरक्षारक्षकदेखील तैनात केले जातील.
- बी. बी. नेमाने, अतिरिक्त आयुक्त, महापालिका