काका पवार यांच्या तालमीतच घडू शकतो आॅलिम्पियन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2018 12:58 AM2018-01-14T00:58:41+5:302018-01-14T00:59:16+5:30
अर्जुन पुरस्कारप्राप्त काका पवार प्रतिभावान आंतरराष्ट्रीय मल्ल घडवत आहेत. त्यांच्या तालमीमधीलच मल्ल खाशाबा जाधव यांच्यानंतर आॅलिम्पिकमध्ये भारताला पदक जिंकून देणारा महाराष्ट्राचा पहिलवान निर्माण होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे तो १९६४ साली टोकियो आॅलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणारे महाराष्ट्राच्या मातीतील पहिलवान बंडू पाटील यांनी. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील मल्ल घडण्यासाठी त्यांना पाठबळ देऊन त्यांना शासनाने दत्तक घेण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.
- जयंत कुलकर्णी
औरंगाबाद : अर्जुन पुरस्कारप्राप्त काका पवार प्रतिभावान आंतरराष्ट्रीय मल्ल घडवत आहेत. त्यांच्या तालमीमधीलच मल्ल खाशाबा जाधव यांच्यानंतर आॅलिम्पिकमध्ये भारताला पदक जिंकून देणारा महाराष्ट्राचा पहिलवान निर्माण होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे तो १९६४ साली टोकियो आॅलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणारे महाराष्ट्राच्या मातीतील पहिलवान बंडू पाटील यांनी. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील मल्ल घडण्यासाठी त्यांना पाठबळ देऊन त्यांना शासनाने दत्तक घेण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.
औरंगाबाद जिल्हा तलवारबाजी संघटनेतर्फे राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त तलवारबाजी संघटनेतर्फे शुक्रवारी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या मातांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला. या सोहळ्यानिमित्त आॅलिम्पियन बंडा पाटील औरंगाबादेत आले होते. याप्रसंगी त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना विशेष संवाद साधला.
आताचे पहिलवान महाराष्ट्र केसरी जिंकल्यावर त्यावरच समाधान मानतात. देशाचे प्रतिनिधित्व करण्याचे त्यांचे स्वप्न नसते. याविषयीही त्यांना छेडले असता ते म्हणाले, ‘‘महाराष्ट्रात चांगले मल्ल आहेत; परंतु त्यांना पुरेशा सुविधा नाहीत. शासनाचेही पहिलवानांकडे दुर्लक्ष आहे. त्यांना त्यांच्याकडून पाठिंबाही मिळत नाही. उच्च प्रतीचे प्रशिक्षण त्यांना मिळत नाही. श्रीमंत कुटुंबातून कधी मल्ल येत नाही तो गरीब कुटुंबातीलच असतो. त्यामुळे खर्च करण्याचीही ताकद त्यांच्यात नसते. सरकारने पहिलवानाला दत्तक घ्यायला हवे.’’
सलग सात वेळेस महाराष्ट्र केसरीत ६५ किलो वजन गटात सुवर्णपदक जिंकणाºया बंडा पाटील यांना १९८९ महाराष्ट्र शासनाने एक घर देण्याची मंजुरी मिळाल्यानंतरही ते अद्यापही न मिळाल्याची खंत अजूनही त्यांच्या मनात आहे. एक आॅलिम्पियन पहिलवान असतानाही त्यांना अद्यापही आर्थिक विवंचनेतच जगावे लागते. कोल्हापूर जिल्ह्यातील वारणा रेठरे येथे सध्या स्थित असणारे बंडा पाटील म्हणाले, ‘‘शासनातर्फे १९८९ साली मला घराची मंजुरी मिळाली होती; परंतु शासनदरबारी १0 वर्षे हेलपाटे घातल्यानंतरही ते आपल्याला मिळाले नाही. या हेलपाट्यापाई शेतीतले पैसेही आपण त्यात घातले. आॅलिम्पियन असतानाही आपल्याला फक्त ४ हजार रुपयेच मानधन मिळते. घरी दोन एकर शेती आणि वार्षिक फक्त एक लाख उत्पन्न आहे, अशी परिस्थिती असल्यास मल्ल कसे तयार होतील.’’ आपले आधीचे दिवस आठवताना ते म्हणाले, ‘‘गावात तालीम नव्हती. घरची परिस्थिती प्रतिकूल होती. गुरूंचे मार्गदर्शन नसतानाही वयाच्या दहाव्या वर्षापासूनच नदीच्या वाळूतच कुस्तीचे धडे घेतले आणि गुणवत्ता पाहून येथील नागरिकांनीच मला पैसे देऊन कोल्हापूरला तालमीमध्ये पाठवले. १९६४ साली टोकियो आॅलिम्पिकसाठी निवड झाली तेव्हा दिल्लीपर्यंत पोहोचण्यासाठी मला मामासाहेब मोहोळ यांनी त्या वेळेस पाच हजार रुपये दिले होते.’’
अर्जुन पुरस्कारप्राप्त काका पवार यांचे कौतुक वाटते. ते सध्या चांगले पहिलवान घडवत आहेत आणि स्वत:कडे काहीही नसताना काका पवार इतरांची आर्थिक मदत घेऊन पहिलवान घडवत आहेत. १९५६ साली खाशाबा जाधव यांच्यानंतर महाराष्ट्राला आॅलिम्पिकमध्ये पदक जिंकून देणारे पहिलवान हे फक्त काका पवार यांच्या तालमीतच घडू शकतात.
काका पवार हे त्यांच्या कुस्ती केंद्रात प्रशिक्षण घेत असलेल्या मल्लांसाठी प्रचंड मेहनत घेत आहेत. राहुल आवारे याच्याकडेही प्रचंड गुणवत्ता असून, तो आॅलिम्पिकमध्ये देशाचे प्रतिनिधित्व नक्कीच करील. त्याच्यात आॅलिम्पिकमध्ये पदक जिंकून देणाºया खाशाबा जाधव यांच्या कामगिरीची पुनरावृत्ती करण्याची धमक आहे; परंतु त्याला सर्वांच्या पाठबळाची आवश्यकता आहे, असे आॅलिम्पियन बंडा पाटील म्हणाले.