मराठवाड्यातून ओमायक्रॉन हद्दपार; रुग्णसंख्या शून्यावर आल्याने मोठा दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2022 05:05 PM2022-02-12T17:05:47+5:302022-02-12T17:07:07+5:30
Omicron Variant : रुग्णसंख्या कमी होत असल्यामुळे संस्थात्मक अलगीकरण केलेल्या रुग्णांची संख्या घटली आहे.
औरंगाबाद : मराठवाड्यात ( Corona In Marathwada ) दीड महिन्यात ओमायक्रॉनचे (Omicron Variant) एकूण ५१ रुग्ण आढळले होते. त्या सगळ्या रुग्णांवर उपचार करण्यात आले. ते सर्व बरे झाले असून, सध्या विभागात ओमायक्रॉनचा एकही रुग्ण नाही. विभागात ओमायक्रॉन रुग्णसंख्या शून्यावर आली आहे. सोबतच कोरोनाची रुग्णसंख्यादेखील कमी होत चालल्यामुळे विभागासाठी मोठा दिलासा मिळाला आहे.
विभागात मागील २४ तासांत कोरोनाचे ५७० रुग्ण आढळले. विभागात सध्या एकूण ७ हजार ५०६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. कोरोना आणि ओमायक्रॉनच्या रुग्णसंख्येमुळे ४०० कोटींची मागणी प्रशासनाने शासनाकडे केली होती. आजवर डीपीसीतूनच उपचार खर्च करावा लागला. औरंगाबादेत १७४, नांदेड जिल्ह्यात ९६, लातूरमध्ये १०२, जालन्यात २१, हिंगोली ३३, बीडमध्ये १५, परभणीत ४४ आणि उस्मानाबाद जिल्ह्यात ८५ असे ५७० कोरोनाबाधित रुग्ण गेल्या २४ तासांत आढळून आले.
विभागात रिकव्हरी रेट ९६.४५ टक्के झाला आहे तर २.३० टक्के मृत्यूदर आहे. रुग्णसंख्या कमी होत असल्यामुळे संस्थात्मक अलगीकरण केलेल्या रुग्णांची संख्या घटली आहे. सध्या १ हजार ६२ रुग्ण क्वारंटाइन आहेत. तरी घरी ७ हजार ६५९ रुग्ण उपचार घेत आहेत. शहरांच्या तुलनेत ग्रामीण भागात रुग्णसंख्या जास्त आहे.