Omicron Variant : संभाव्य तिसऱ्या लाटेपूर्वी युद्धपातळीवर तयारी, महापालिका स्वत:चे ६५० ऑक्सिजन बेड ठेवणार सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2021 07:53 PM2021-12-14T19:53:50+5:302021-12-14T19:57:25+5:30
Omicron Variant Care: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत महापालिकेकडे फक्त १५० ऑक्सिजन बेड होते. आता ६५० ऑक्सिजन बेड तयार केले जाणार आहेत.
औरंगाबाद : ओमायक्रॉनचा विषाणू (Omicron Variant) राज्यातील काही शहरांमध्ये आढळला. त्यामुळे कोरोनाची ( Corona Virus Third Wave ) तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. महापालिका प्रशासनाने ( Aurangabad Municipal Corporation ) मागील काही दिवसांपासून व्यापक उपाययोजना सुरू केल्या आहेत. महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये तब्बल ६५० ऑक्सिजन बेडस् उपलब्ध करण्याचे काम युध्दपातळीवर केले जात आहे. येत्या आठवडाभरात हे बेडस् उपलब्ध होतील, असे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी सांगितले.
ओमायक्रॉनचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या राज्यात वाढू लागली आहे. मुंबई, पुणे आणि पिंप्री-चिंचवड येथून औरंगाबादेत रोज ये-जा करणाऱ्यांची संख्या जास्त आहे. नागपूर शहरातही रुग्ण आढळून आला. त्यामुळे औरंगाबादचा धोका वाढल्याचे मानले जात आहे. महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी सांगितले की, ओमायक्रॉनच्या संसर्गामुळे कोरोनाची तिसरी लाट येणार, असे आता वाटते आहे. टास्क फोर्सच्या बैठकीत वेळोवेळी यासंदर्भात चर्चाही करण्यात आली. विषाणूचा प्रसार रोखणे शक्य नाही. नागरिकांनी मास्क वापरलाच पाहिजे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत महापालिकेकडे फक्त १५० ऑक्सिजन बेड होते. आता ६५० ऑक्सिजन बेड तयार केले जाणार आहेत. त्यात सिडको एन ८ येथील मनपाच्या रुग्णालयात ५० बेडस् , सिडको एन ११ येथील रुग्णालयात ५० बेडस्, नेहरूनगरच्या आरोग्य केंद्रात १००, तर पदमपुरा येथील कोरोना सेंटरमध्ये १०० ऑक्सिजन बेडस् तयार केले जाणार आहेत. या सर्व ठिकाणी ऑक्सिजनची सेंट्रल लाईन टाकण्याचे काम उद्या मंगळवारपासून सुरू होईल. मेल्ट्रॉनच्या कोविड रुग्णालयात ३५० ऑक्सिजन बेडस् आहेत. त्यामुळे ६५० बेडस् ऑक्सिजनचे सज्ज राहतील. त्याशिवाय गरवारे कंपनीने उभारलेल्या कोविड केअर सेंटरमध्ये १२५ बेडस् ऑक्सिजनवर आहेत. या ठिकाणी २० किलोलिटरचा ऑक्सिजन प्लांट उभारण्यात आला आहे.