Omicron Variant: मोठा दिलासा, विदेशातून आलेले १८ जण आणि २ विदेशी नागरिकांचा रिपोर्ट निगेटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2021 07:31 PM2021-12-03T19:31:49+5:302021-12-03T19:34:01+5:30
Omicron Variant: या नागरिकांची यादी जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त होताच महापालिकेने तातडीने या नागरिकांची कोरोना चाचणी करण्याचा निर्णय घेतला.
औरंगाबाद : मागील १५ दिवसात औरंगाबादेत आलेल्या १८ जणांची गुरुवारी आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली होती. आज सर्व १८ नागरिकांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. यामुळे औरंगाबादकरांना मोठा दिलासा मिळाला असून आरोग्य यंत्रणेने काही अंशी सुटकेचा निश्वास सोडला आहे. यापूर्वी दोन विदेशी नागरिकांची चाचणी करण्यात येऊन त्यांचा अहवाल निगेटिव्ह आलेला आहे.
कोरोनाच्या ओमायक्रॉन विषाणूची धास्ती प्रशासनाने घेतली आहे. गेल्या १५ दिवसांत विदेशातून शहरात आलेल्या ३२ जणांपैकी २२ जण हे शहरातील रहिवासी आहेत. या नागरिकांची यादी जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त होताच महापालिकेने तातडीने या नागरिकांची कोरोना चाचणी करण्याचा निर्णय घेतला. या सर्वांशी आरोग्य वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मोबाईलवरून संपर्क साधून त्यांना आरोग्य केंद्रात बोलावले. गुरुवारी १८ जणांची विविध आरोग्य केंद्रात आरटीपीसीआर करण्यात आली. त्याचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. तर तिघे बाहेरगावी गेले असून एकजणाने आज चाचणी केली आहे, त्याचा रिपोर्ट उद्या मिळेल.
दरम्यान, कर्नाटककडून औरंगाबादकडे येणाऱ्या वाहनांवर प्रशासनाने नजर ठेवण्याची तयारी सुरू केली आहे. कोरोनाच्या ओमायक्रॉन विषाणूचे रुग्ण शेजारच्या कर्नाटक राज्यात आढळून आले आहेत. त्यामुळे प्रशासनाने धास्ती घेतली असून, बाहेरगावाहून विमानाने किंवा रेल्वेने येणाऱ्या प्रत्येकाची कोरोना चाचणी केली जाणार आहे.