Omicron Variant: मराठवाड्यात ओमायक्रॉन पार्श्वभूमीवर अलर्ट; तारखेनिहाय रुग्णसंख्येचे विश्लेषण होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2021 12:07 PM2021-12-02T12:07:58+5:302021-12-02T12:08:25+5:30
Omicron Variant: विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना सतर्कतेच्या सूचना केल्या आहेत.
औरंगाबाद : मराठवाड्यात कोरोनाच्या पहिल्या लाटेत तत्परता घेण्यात आली होती. दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या वाढल्यामुळे ऑक्सिजन, बेड्सची कमतरता होती, तसेच रेमडेसिविर इंजेक्शनचाही तुटवडा होता. या सगळ्या अनुभवानंतर आता ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर सतर्कतेच्या सूचना विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना केल्या आहेत.
मार्च २०२१ च्या दुसऱ्या आठवड्यात कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव जाणवण्यास सुरुवात झाली. मराठवाड्यात दुसऱ्या लाटेत कोरोनाचे १५ दिवसांत पाचपट रुग्ण होण्याचे प्रमाण होते. तारखेनिहाय रुग्णसंख्या आणि त्या-त्या दिवशी कराव्या लागणाऱ्या उपाययोजना, औषधे, व्हेंटिलेटर, ऑक्सिजनची गरज कशी होती, याचा आढावा घेण्याचे आदेश आयुक्त केंद्रेकर यांनी दिले आहेत.
दुसऱ्या लाटेत रुग्णवाढ होण्यात औरंगाबाद जिल्हा आघाडीवर होता. औरंगाबादखालोखाल जालना, नांदेड, बीड, लातूर या जिल्ह्यांचा क्रमांक होता तर हिंगोली आणि उस्मानाबादमध्ये रुग्णसंख्या कमी होती. मार्च, एप्रिल या दोन महिन्यांत आणि एप्रिल, मे महिन्यांत काय परिस्थिती होती, याचे तारखेनिहाय रुग्णसंख्येचे विश्लेषण करण्याच्या सूचना आयुक्तांनी केल्या आहेत.