३३ वर्षांपासून ओंकारेश्वर मंदिराचा कारभार महिलांच्या हाती
By प्रशांत तेलवाडकर | Published: September 8, 2023 06:44 PM2023-09-08T18:44:47+5:302023-09-08T18:45:30+5:30
नारीशक्ती, स्वच्छता, शिस्त व भक्तीचे आदर्श मॉडेल
छत्रपती संभाजीनगर : उल्कानगरीतील ओंकारेश्वर महादेव मंदिर भाविकांचे श्रद्धास्थान बनले आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे येथील सर्व व्यवस्थापन मागील ३३ वर्षांपासून महिलांच्या हाती आहे. मंदिराच्या अर्धा एकर परिसरात स्वच्छता, शिस्तीची कडकपणे अंमलबजावणी केली जाते. सोमवारी, ४ सप्टेंबरला या मंदिराचा वर्धापन दिन साजरा करण्यात येणार आहे.
मंदिरांचे व्यवस्थापन सांभाळणे साधे काम नाही. कारण चांगले उपक्रम राबविले तर कोणी कौतुक करणार नाही. पण एखादी अनवधानाने चूक झाली तर त्यावर ताशेरे ओढण्यासाठी हजारो जण पुढे येतात. मात्र हे एक आदर्श मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे. मंदिरात पाऊल ठेवताच भगवान शंकराची भव्य मूर्ती आणि शांत, मांगल्यमय वातावरणाने मन प्रसन्न होते. येथे ओंकारेश्वर शिवलिंग व त्यावर शेषनागाचे दर्शन होते. शिवलिंगाशिवाय गणपती, पार्वती, श्रीराम, लक्ष्मण, सीता, वैष्णोदेवी, श्री दत्तात्रय, विठ्ठल रुख्माई, श्री राधा-कृष्ण, श्री साईबाबा, श्री स्वामी समर्थ, श्री गजानन महाराजांचे दर्शन घडते.
पदोपदी नियमावली
महिला विश्वस्त मंडळाचा शिस्तीचा कारभार आहे. याची पदोपदी जाणीव होते. कारण, भाविकांनी काय करावे व काय करू नये, याची सूचना देणाऱ्या पाट्या जागोजागी आहेत.
मंदिराचे व्यवस्थापन सांभाळणाऱ्या कोण?
अध्यक्ष स्नेहलता ठाकूर, उपाध्यक्ष जयश्री कुलकर्णी, कोषाध्यक्ष सुनीता कुलकर्णी, सचिव अंजली कुलकर्णी, उपसचिव अनुराधा बियाणी, सदस्य लता कुलकर्णी, शैला भालेराव, मनीषा खंडाळकर, कल्पना सुरडकर, ज्योती गीर, संगीता जोजारे, छाया ठाकूर, स्मिता गरुड या ओंकारेश्वर मंदिराचे यशस्वीपणे व्यवस्थापन सांभाळतात.
ठेवीवरील व्याजातून वार्षिक उत्सव साजरा
काही दानशूर भाविकांनी देणगी दिल्या आहेत. त्या ठेवीरूपात बँकेत जमा आहेत. या व्याजातून वार्षिक उत्सव साजरा केला जातो. कारभार पारदर्शक असल्याने भाविकही सढळ हाताने देणग्या देतात.
कुराण, बायबलसह सर्व धार्मिक ग्रंथ ग्रंथालयात
ओंकारेश्वर मंदिराच्या बाजूला हरिहरेश्वर पारायण हॉल व प्रसादालय उभारण्यात आले आहे. याच ठिकाणी ओकारेश्वर ग्रंथालय आहे. यात हिंदूंचे सर्व धार्मिक ग्रंथ आहेतच; शिवाय कुराण, बायबलही येथे तेवढ्याच आदराने ठेवण्यात आले आहे, हे विशेष.