ओमायक्रॉनचे संकट, ९० टक्के ‘बेफिक्रे’ नागरिकांचे मास्क गायब !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2021 11:44 AM2021-12-06T11:44:58+5:302021-12-06T11:49:06+5:30

Omicron Variant: महापालिकेच्या नागरी मित्र पथकाकडून मास्क न लावणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाईला सुरुवात केल्यावर ओरड सुरू होते.

Omycron crisis, 90% of 'carefree' citizens' masks disappear! | ओमायक्रॉनचे संकट, ९० टक्के ‘बेफिक्रे’ नागरिकांचे मास्क गायब !

ओमायक्रॉनचे संकट, ९० टक्के ‘बेफिक्रे’ नागरिकांचे मास्क गायब !

googlenewsNext

औरंगाबाद : ओमायक्रॉन (Omicron Variant) हा विषाणू मागील आठवड्यापर्यंत दक्षिण आफ्रिका आणि इतर देशांमध्ये होता. पाहता पाहता हा विषाणू आता मुंबईला धडकला. आपल्या शहरापर्यंत या विषाणूला येण्यासाठी फारसा वेळ लागणार नाही, तरीही औरंगाबादकर बेफिकीर असल्याचे दिसून येत आहे. कोरोना संसर्गही ( Corona Virus in Aurangabad) अद्याप संपलेला नाही. मृत्युसत्र, बाधित रुग्ण सापडतच आहेत. सार्वजनिक ठिकाणी वावरताना ९० टक्के औरंगाबादकरांच्या चेहऱ्यावरील मास्क गळून पडल्याची प्रचिती येत आहे.

कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत अनेकांचे हाल झाले. लॉकडाऊन कोणालाच परवडणार नाही. लॉकडाऊनमध्ये कधी एकदाचे जनजीवन पूर्ववत होईल, असे प्रत्येकाला वाटत होते. शासनाने संसर्ग कमी झाला म्हणून निर्बंध शिथिल केले. कोरोनाचे साधे आणि सोपे नियम आजही कायम आहेत. सार्वजनिक ठिकाणी फिरताना मास्क वापरलाच पाहिजे, या नियमाचेही औरंगाबादकरांकडून पालन होत नाही, हे आश्चर्यच म्हणावे लागेल. स्वत:च्या आणि इतरांच्या जिवाशी एकप्रकारे खेळच सुरू आहे. प्रत्येकाला वाटतेय की, कोरोना गेला; पण तो गेला नसून कमी झाला आहे. मागील तीन महिन्यांची कोरोनाची आकडेवारी बघितली तर शहरात २३ जणांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला. तब्बल ६०३ जणांना कोरोनाची बाधा झाली.

लस घ्या म्हणून मागील ११ महिन्यांपासून शासकीय यंत्रणा ओरडून सांगतेय; तरी नागरिकांवर काहीच परिणाम नाही. आता प्रशासन कठोर झाल्यावर लस घेण्यासाठी रांगा लागत आहेत. अजूनही असंख्य नागरिकांनी पहिला डोसही घेतलेला नाही. काहींनी पहिला डोस घेऊन सहा ते आठ महिने उलटले तरी दुसरा डोस घेतला नाही.

कारवाई केली तर ओरड होते...
महापालिकेच्या नागरी मित्र पथकाकडून मास्क न लावणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाईला सुरुवात केल्यावर ओरड सुरू होते. मास्क लावून आपण वावरलो तर कोणी कशाला दंड लावेल? ओमायक्रॉनमुळे महापालिका पुन्हा एकदा नियम कडक करणार आहे. बाजारपेठेत दंडात्मक कारवाईला सुरुवात करणार आहे.

काय म्हणतात कोरोनाचे आकडे ?
महिना- मृत्यू - बाधित रुग्ण
सप्टेंबर- ०७- २०७
ऑक्टोबर- ०७- १९०
नोव्हेंबर- ०९-२०६
एकूण- २३- ६०३

Web Title: Omycron crisis, 90% of 'carefree' citizens' masks disappear!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.