ऑनड्युटी होमगार्डचा विजेच्या धक्क्याने मृत्यू; कुटुंबाला ५० लाखांचा धनादेश
By राम शिनगारे | Published: May 16, 2023 08:26 PM2023-05-16T20:26:12+5:302023-05-16T20:28:40+5:30
आर्थिक मदतीसाठी महाराष्ट्र होमगार्डसने एक महत्वपूर्ण पाऊल टाकले आहे.
छत्रपती संभाजीनगर : नवरात्र उत्सवाच्या बंदोबस्तामध्ये असलेल्या एका होमगार्डचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला होता. त्या होमगार्डच्या कुटुंबाला ५० लाख रुपयांच्या धनादेश मुंबईत आयोजित एका कार्यक्रमात सोमवारी देण्यात आला. या मदतीमुळे होमगार्डच्या कुटुंबीयांचे डोळे कृतज्ञतेने भरून आले.
हरीबा शेनफड फरकाडे (रा.बनकिनोळा, ता. सिल्लोड) यांचा नवरात्र उत्सवात वडोदबाजार पोलिस ठाण्यात ऑन ड्युटी कार्यरत असताना विजेचा धक्का लागून मृत्यू झाला होता. या घटनेमुळे फरकाडे यांचे कुटुंब उघड्यावर आले होते. या कुटुंबाला आर्थिक मदतीसाठी महाराष्ट्र होमगार्डसने एक महत्वपूर्ण पाऊन पुढे टाकत कर्तव्यावर असताना जीव गमवाव्या लागलेल्या कुटुंबाला विमा योजनेतंर्गत ५० लाख रुपयांचा धनादेश देण्याचा निर्णय घेतला होता. महाराष्ट्र होमगार्डचे पोलिस महासंचालक डॉ. भुषणकुमार उपाध्याय, औरंगाबाद जिल्ह्याचे अपर पोलिस अधीक्षक तथा जिल्हा होमगार्ड समादेश सुनिल लांजेवार यांच्यासह एचडीएफसी बँक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मुंबईतील होमगार्डच्या मुख्यालयात ५० लाख रुपयांचा धनादेश फरकाडे कुटुंबाकडे सुपूर्द करण्यात आला. यावेळी बोलताना होमगार्डचे महासंचालक डॉ. भुषणकुमार उपाध्याय म्हणाले, हरीबा फरकाडे यांच्या कुटुंबाला मिळालेली मदत होमगार्डच्या इतिहासात मैलाचा दगड ठरणार आहे. या घटनेचे अनुकरण इतर राज्यांनाही मार्गदर्शक ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हा होमगार्ड कार्यालयाचा मोलाचा वाटा
मृत फरकाडे यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत मिळावी, यासाठी औरंगाबाद जिल्हा समादेशक यांच्या कार्यालयाचा मोलाचा वाटा आहे. जिल्हा समादेशक सुनिल लांजेवार यांनी होमगार्डच्या कुटुंबाला कठीण काळात मदत केली. तसेच त्यांच्या कार्यालयाने राबविलेल्या उपक्रमांमुळे होमगार्डचे मनोबल उंचावले असल्याचेही डॉ. उपाध्याय यांनी सांगितले.