नागपंचमीला कागदावरील नागोबाचीच करावी लागणार पूजा;२०० किलो पुरण, ६०० पोळ्यांची ऑर्डर

By प्रशांत तेलवाडकर | Published: August 9, 2024 01:40 PM2024-08-09T13:40:25+5:302024-08-09T13:41:19+5:30

श्रावणातील पहिला सण; नागपंचमी-जिवतीची पूजा एकाच दिवशी

On Nag Panchami, paper Nagoba will have to be worshipped; 200 kg puran, 600 polya ordered | नागपंचमीला कागदावरील नागोबाचीच करावी लागणार पूजा;२०० किलो पुरण, ६०० पोळ्यांची ऑर्डर

नागपंचमीला कागदावरील नागोबाचीच करावी लागणार पूजा;२०० किलो पुरण, ६०० पोळ्यांची ऑर्डर

छत्रपती संभाजीनगर : श्रावण महिन्यातील पहिला सण ‘नागपंचमी’ आज, शुक्रवारी साजरी करण्यात येणार आहे. पूर्वी गारुडी टोपलीत नाग घेऊन घरोघरी जात असे व त्याची सुवासिनी पूजा करीत असत. मात्र,सरकारने जिवंत नागोबाची पूजा करण्यावर बंदी आणल्याने, मागील अनेक वर्षांपासून कागदावर काढलेल्या नागोबाची पूजा करण्यातच सर्वजण धन्यता मानत आहेत.

लॅमिनेशन केलेले नागोबाचे छायाचित्र
पूर्वी महिला नागपंचमीला भिंतीवर नागोबाचे चित्र काढत होत्या. मात्र, त्यानंतर नागोबाच्या प्रिंट केलेल्या चित्राच्या कागदाचा वापर होऊ लागला. कागद फाटत असल्याने मागील दोन वर्षांपासून लॅमिनेशन केलेले नागोबाचे छायाचित्र बाजारात विक्रीसाठी येत आहे. यात नऊ वाट्यांचा नाग, पाच वाट्यांचा नाग, त्यात बाहेरून भलीमोठी नागीण असे हाताने चित्र रेखाटलेले असते. याची पूजा सर्व सुवासिनी करतात. शहरात नागोबाचे अशी सुमारे ५० हजारांपेक्षा अधिक छायाचित्रे विक्रीला आली आहेत.

नागपंचमी-जिवतीची पूजा एकाच दिवशी
यंदा जशी श्रावणाची सुरुवात सोमवारी झाली, तसेच श्रावणात अनेक योग जुळून आलेले आहेत. श्रावणात दर शुक्रवारी सुवासिनी ‘जिवतीची ’ (ज्योती)ची पूजा करीत असतात. यंदा शुक्रवारी जिवतीची पूजा व नागपंचमी एकत्र आली आहे. अनेक वर्षांनंतर हा असा योग जुळून आला आहे.

२०० किलो तयार पुरण, ६०० पोळ्यांची ऑर्डर
नागपंचमीच्या दिवशी काही कापायचे, भाजायचे नसते, भाजी चिरायची नसते. उकडलेले अन्नपदार्थ खायचे असतात. पुरणाच्या पोळीचा नैवेद्य दाखवून ती खाल्ली जाते. यासाठी बाजारात २०० किलो रेडीमेड पुरण व ६०० पुरणपोळीची ऑर्डर प्राप्त झाल्याची माहिती व्यापारी विश्वजित भावे यांनी दिली. याशिवाय घरोघरी उकडलेले पुरण घातलेले व न घातलेले धिंड तयार केले जाणार आहे.

लाह्या-फुटाण्याच्या प्रसादाला मागणी
नागपंचमीला लाह्या-फुटणाचा प्रसाद दाखविला जातो. यानिमित्त गुरुवारी लाह्या-फुटाण्याच्या प्रसादाला मागणी होती. २० रुपयांना एक छोटा पुडा विकला जात होता.

नागपंचमीला रंगणार कलगीतुरा
नागपंचमी व कलगीतुरा ही जुनी परंपरा आजही शहरात टिकून आहे. पदमपुरा येथील हनुमान मंदिरात सकाळी ११:३० वाजता कलगीतुरा कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. प्रभुलाल तोनगिरे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम होत असून, आसपासच्या पंचक्रोशीतून कलगीतुरा संघ येणार आहेत.

Web Title: On Nag Panchami, paper Nagoba will have to be worshipped; 200 kg puran, 600 polya ordered

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.