मतदानाच्या पूर्वसंध्येला दारू पिऊन एस.टी. कर्मचाऱ्यांची डॉक्टरला मारहाण
By राम शिनगारे | Published: June 23, 2023 06:23 PM2023-06-23T18:23:01+5:302023-06-23T18:23:16+5:30
तीन आरोपींना क्रांती चौक पोलिसांनी ठोकल्या बेड्या
छत्रपती संभाजीनगर : एस. टी. को-ऑपरेटिव्ह बँकेच्या निवडणुकीत रात्रीचे नियोजन केल्यानंतर दारू पिऊन रस्त्याने चालत जाताना एस.टी.च्या तीन कर्मचाऱ्यांनी एका सहकाऱ्यासह नामांकित डॉक्टरला रुग्णालयात घुसून बेदम मारहाण केली. हा प्रकार गुरुवारी रात्री घडला. या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर २४ तासांच्या आत क्रांती चौक पोलिसांनी तीन आरोपींना बेड्या ठोकल्याची माहिती निरीक्षक संतोष पाटील यांनी दिली.
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या आरोपींमध्ये एस.टी.चे कर्मचारी सुनील संतोष जाधव (रा.सांगळे गल्ली, हर्सूल), श्रीधर शिवाजीराव होळंबे (रा. बीड), नीलेश शिखरे (रा. हर्षनगर) या तिघांसह अक्षय साळवे (रा. सातारा परिसर) याचा समावेश आहे. एस.टी. कर्मचारी असलेल्या तीन आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्वचारोगतज्ज्ञ डॉ. दीपक मसलेकर (६७) यांचा कार्तिकी हॉटेलच्या शेजारी दवाखाना आहे. गुरुवारी रात्री चार जण एस. टी. वर्कशॉपकडून येत दवाखान्याच्या परिसरातून आरडाओरड करत जात होते तेव्हा त्याठिकाणी उपस्थित कर्मचाऱ्यांनी डॉक्टर आतमध्ये आहेत, गाेंधळ घालू नका, असे सांगितले.
तेव्हा चौघे शिवीगाळ करीत दवाखान्यात घुसले. त्याठिकाणी डाॅक्टरच्या केबिनमध्ये जात त्यांना बेदम मारहाण केली. चौघांपैकी एकाने हातातील लोखंडी कड्याने डॉक्टरांच्या कपाळावर मारले. त्यात त्यांना खोलवर जखम झाली. या घटनेमुळे समर्थनगर परिसरात एकच गोंधळ उडाली. डॉक्टरांनी क्रांती चौक पोलिस ठाणे गाठत तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आला. तपास अधिकारी उपनिरीक्षक छोटूराम ठुबे यांच्यासह इतरांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. त्यात आरोपी दिसून आले. तिघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
माजी खासदारांची पोलिस ठाण्यात धाव
डॉ. मसलेकर यांना मारहाण झाल्याची माहिती समजताच माजी खा. चंद्रकांत खैरे, माजी नगरसेवक सचिन खैरे यांनी क्रांती चौक पोलिस ठाण्यात धाव घेतली. त्याठिकाणी पोलिस निरीक्षक संतोष पाटील यांच्याकडे आरोपींना अटक करण्याची मागणी केली. निरीक्षक पाटील यांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींची ओळख पटवली असल्याचे सांगितले.