चौथ्या दिवशीही सकल मराठा समाजाचे आंदोलन सुरूच
By बापू सोळुंके | Published: May 4, 2023 07:36 PM2023-05-04T19:36:40+5:302023-05-04T19:36:55+5:30
मराठा आरक्षणाची मागणी: विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांनी आंदोलकांशी घेतली भेट
छत्रपती संभाजीनगर : मराठा आणि ओबीसीमध्ये असलेले कुणबी मराठा एकच असून मराठा समाजाला ओबीसीचे आरक्षण द्यावे, या मागणीसाठी १ मे पासून सकल मराठा समाजाने क्रांतीचौकात सुरू केलेले ठिय्या आंदोलन आज चौथ्या दिवशीही ४ मे रोजी सुरू होते. विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी गुरूवारी सकल मराठा समाजाच्या आंदोलकाची घेतली भेट घेतली.
पश्चिम महाराष्ट्रातील दोन-तीन जिल्हे वगळता अन्य राज्यभरातील मराठा समाजाला कुणबी मराठा हे ओबीसीचे प्रमाणपत्र दिले जाते. राज्यसरकारने नेमलेल्या विविध आयेाग आणि समित्यांनी कुणबी मराठा आणि मराठा समाज एकच असल्याचा आणि मराठा समाज आर्थिकदृष्ट्या मागास असल्याचा अहवाल दिलेला आहे. तरीही सुद्धा मराठा समाजाला आरक्षणापासून वंचीत का ठेवलं जात आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आतापर्यंत ४३ बांधवांनी आत्मबलिदान दिले. तसेच ५८ मोर्चे काढण्यात आले होते. यानंतर २०१९मध्ये तत्कालीन राज्यसरकारने दिलेले एसईबीसी हे आरक्षण सर्वेाच्च न्यायालयाने रद्द केले. मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश हाच अंतिम पर्याय आहे, असे नमूद करीत प्रा.चंद्रकांत भराट, सुरेश वाकडे, सतीश वेताळ, रेखा वाहटूळे, दिव्या पाटील,सुकन्या भोसले, मनोज गायके, रविंद्र वाहटूळे आदींसह मराठा कार्यकर्त्यांनी १ मे पासून क्रांतीचौकात ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.
५ मे रोजी आत्मदहनाचा इशारा
१ मे पासून सुरू केलेल्या आंदोलनाची राज्यसरकारने दखल घेतली नाही. यामुळे संतप्त महिला आंदोलकांनी ५ मे रोजी आत्मदहन करण्यात येईल, असा इशारा दिला आहे. तसेच शिंदे फडणवीस सरकार टिकवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात जात आहे परंतु मराठा आरक्षणासाठी ते काहीही करत नसल्याचा आरोप आंदोलकानी लावला.
मराठा आरक्षणावर सरकारचा वेळकाढूपणा- अंबादास दानवे
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाची याचिका फेटाळल्यानंतर. शिंदे - फडणवीस सरकार फक्त वेळ काढू पणा करत असल्याचा आरोप आ. अंबादास दानवे यांनी पत्रकारांशी बोलताना केला. ते म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षण मिळू नाही अशी केंद्र आणि राज्य सरकारची भावना आहेत. फडणवीस यांनी विरोधी विरोधी पक्षात असताना आमचे सरकार आल्याबरोबर मराठा मराठा समाजाला आरक्षण दिले, जाईल असे म्हटले होते, ते आश्वासन त्यांनी पाळले नसल्याचा आरोप दानवेंनी केला.