धनत्रयोदशीचा मुहूर्त, छत्रपती संभाजीनगरवासीयांनी खरेदी केले १५ कोटींचे चांदी-सोने
By प्रशांत तेलवाडकर | Published: November 11, 2023 02:28 PM2023-11-11T14:28:31+5:302023-11-11T14:29:51+5:30
अनेक जण लक्ष्मीचे शिक्के, तर काही महिला दागिने खरेदी करीत होत्या.
छत्रपती संभाजीनगर : शहरवासीयांनी धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर शुक्रवारी कोट्यवधींचे सोने खरेदी करीत मुहूर्ताचे सोने केले. कोणी दागिने खरेदी केले तर कोणी सोन्याचा शिक्का खरेदी केला. दिवसभरात १५ कोटींची उलाढाल सराफा बाजारात झाली.
सोने म्हटले की, महिलांचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय, त्यात धनत्रयोदशी; मग काय? दागिने खरेदीचा आनंदच काही और होता. सराफा बाजारात मोठी गर्दी बघण्यास मिळाली. याशिवाय जालना रोड, त्रिमूर्ती चौक, शिवाजीनगर, सिडको कॅनॉट प्लेस, आविष्कार कॉलनी, गुलमोहर कॉलनी, हडको या भागांतील ज्वेलर्सच्या शोरूममध्ये गर्दी दिसून आली. कोणी २४ कॅरेट सोने खरेदी करीत होते, अनेक जण लक्ष्मीचे शिक्के, तर काही महिला दागिने खरेदी करीत होत्या. काहींनी मंगळसूत्र खरेदी केले तर काहींनी सोन्याचे मणी खरेदी केले.
दुपारनंतर ज्वेलर्सच्या शोरूममध्ये ग्राहकांची वर्दळ वाढली होती. सोने ६१५०० रुपये प्रति दहा ग्रॅम तर चांदी ७३००० रुपये किलो विकली गेली. सोन्याचे भाव गुरुवारच्या तुलनेत ४०० ते ५०० रुपयांनी वधारले होते. चांदीचे भाव स्थिर होते, अशी माहिती ज्वेलर्स आर.के. जालनावाला यांनी दिली. धनत्रयोदशीला सोने विक्री होतेच; शिवाय पाडव्यालाही मोठ्या प्रमाणात सोने विकले जात असल्याची माहिती ज्वेलर्स जुगलकिशोर वर्मा यांनी दिली. शुक्रवारी २० किलो सोने विक्री झाले तसेच चांदी, प्लॅटिनम, डायमंड अशी १५ कोटींची उलाढाल झाली, अशी माहिती ज्वेलर्स राजेंद्र मंडलिक यांनी दिली.
सोने खरेदीची क्षमता पाहून पुण्यातील ज्वेलर्स आकर्षित
छत्रपती संभाजीनगरात दरवर्षी सोने-चांदीची उलाढाल वाढत आहे. सुमारे १० ते १५ टक्क्यांनी विक्रीत वाढ होत आहे. यामुळे या शहराकडे जळगावच नव्हे तर आता पुणे, मुंबईतील नामांकित ज्वेलर्सही आकर्षित होत आहेत. यामुळे येथे पंचतारांकित हॉटेलमध्ये दागिने विक्रीचे प्रदर्शन भरविले जात आहे. त्यासही चांगला प्रतिसाद मिळत आहे.