जी-२० परिषदेनिमित्त ७ कोटींच्या खर्चातून अवघ्या औरंगाबादेत करणार झगमगाट
By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2022 07:22 PM2022-12-27T19:22:27+5:302022-12-27T19:22:45+5:30
जी-२० परिषदेतील सहभागी देशांच्या महिला प्रतिनिधीचे शिष्टमंडळ औरंगाबाद शहराला भेट देणार आहे.
औरंगाबाद : जी-२० परिषदेनिमित्त फेब्रुवारी महिन्यात विदेशी पाहुणे येणार आहेत. महापालिका, जिल्हा प्रशासनातर्फे शहरात सुशोभीकरणाची कामे सुरू करण्यात आली आहेत. मुख्य रस्ते, वाहतूक बेट, पादचारी मार्ग, दुभाजकांमध्ये आकर्षक विद्युत रोषणाई केली जाणार आहे. त्यासाठी तब्बल सात कोटी रुपयांच्या दोन निविदा विद्युत विभागातर्फे प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.
जी-२० परिषदेतील सहभागी देशांच्या महिला प्रतिनिधीचे शिष्टमंडळ औरंगाबाद शहराला भेट देणार आहे. त्यानिमित्ताने शहर जास्तीत जास्त स्वच्छ आणि सुंदर कसे करता येईल, यासाठी तयारी सुरू आहे. सुशोभीकरणासाठी मनपाने शासनाकडे ११ कोटींची मागणी केली होती. राज्य शासनाने तब्बल ५० कोटींचा घसघशीत निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे महापालिका प्रशासन जोमाने कामाला लागले आहे.
मुख्य रस्त्यांवर सुशोभीकरणाची कामे करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत. महापालिकेने कामांचे नियोजन केले आहे. विद्युत विभागातर्फे दुभाजक, वाहतूक बेट, पादचारी मार्गावर रोषणाई करण्यासाठी सात कोटींच्या दोन निविदा प्रसिद्ध केल्या आहेत. यासंदर्भात विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता ए. बी. देशमुख यांनी सांगितले की, फसाड लायटिंगच्या माध्यमातून ग्रीन बेल्ट, पादचारी मार्ग, दुभाजकांमध्ये विद्युत रोषणाई केली जाणार आहे. निविदा भरण्यासाठी ३० डिसेंबर ही शेवटची तारीख आहे. दोन जानेवारी २०२३ रोजी ही निविदा उघडण्यात येणार आहे.
पुण्याच्या पीएमसीची नियुक्ती
जी-२० परिषदेनिमित्त येणारी महिला प्रतिनिधींची समिती मुख्य रस्त्यांवर फिरण्याची शक्यता आहे. त्यामुळे विमानतळ ते ताज हॉटेल या भागातील रस्ते दुभाजक, ग्रीन बेल्ट, पादचारी मार्गावर कायमस्वरूपी रोषणाई केली जाणार आहे. ही विद्युत रोषणाई आकर्षक व्हावी यासाठी पुण्याच्या पीएमसीची नियुक्ती करण्यात आली असल्याचे देशमुख यांनी सांगितले.