एकीकडे पारंपरिक अभ्यासक्रमांना प्रवेश होईना, त्यात नव्या १६ काॅलेजची भर

By योगेश पायघन | Published: September 3, 2022 12:24 PM2022-09-03T12:24:20+5:302022-09-03T12:26:02+5:30

नवीन १६ महाविद्यालयांना शासनाची अंतिम मान्यता

On the one hand, there will be no admission to traditional courses, addition of 16 new colleges | एकीकडे पारंपरिक अभ्यासक्रमांना प्रवेश होईना, त्यात नव्या १६ काॅलेजची भर

एकीकडे पारंपरिक अभ्यासक्रमांना प्रवेश होईना, त्यात नव्या १६ काॅलेजची भर

googlenewsNext

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डाॅ. प्रमोद येवेल यांनी गुणवत्ता वाढ आणि भौतिक सुविधा तपासणीची मोहीम हाती घेतली आहे. आतापर्यंत १९ महाविद्यालयांविरुद्ध दंडात्मक आणि प्रवेशबंदीची कारवाई केली, तर २१ महाविद्यालयांतील मूळ मान्यतेव्यतिरिक्तचे पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रम बंद केले. अशी अवस्था असताना विद्यापीठ कार्यक्षेत्रात २०२२-२३ मध्ये १६ नवीन महाविद्यालये सुरू करण्यासाठी राज्य शासनाने अंतिम मान्यता दिली आहे. यात १४ काॅलेज कला, वाणिज्य, विज्ञान व २ काॅलेज विधि अभ्यासक्रमाचे आहेत.

नॅशनल इन्स्टिट्यूट रँकिंग फ्रेमवर्क (एनआयआरएफ) २०२२ मध्ये विद्यापीठ यावर्षी ८३ व्या स्थानी झळकले. गेल्यावर्षीच्या तुलनेत रँकिंग घटली. विद्यापीठाने रँकिंगमध्ये सुधारणा करण्यासाठी विविध उपाययोजना केल्या. प्रवेश न होणारे अभ्यासक्रम बंद केले, तर पेटंट, संशोधनाकडे लक्ष केंद्रित केले आहे. केवळ परीक्षेसाठी प्रवेश देणाऱ्या महाविद्यालयांसह भाैतिक सुविधा, प्राचार्य, अध्यापक नसलेल्या महाविद्यालयांची तपासणी सुरू केली. त्यात आतापर्यंत ४० महाविद्यालयांवर कारवाई करण्यात आली. अजून ५० हून अधिक महाविद्यालयांची तपासणी होण्याची शक्यता आहे. पारंपरिक कोर्सेसला निम्मेही प्रवेश होत नसताना नव्याने १६ महाविद्यालयांना मान्यता शासनाने दिल्याने कायम विनाअनुदानित तत्त्वावर अंतिम मान्यता दिली आहे.

या अटींवर मिळाली मान्यता
नवीन महाविद्यालयांनी सहसंचालकांकडे भविष्यात कोणत्याही अनुदानाची मागणी करणार नसल्याचे हमीपत्र द्यावे. तोपर्यंत संलग्नीकरणाची प्रक्रिया करू नये. भाैतिक सुविधा अटींची पडताळणी सहसंचालकांनी करावी. त्यानंतरच विद्यापीठ संलग्नतेसाठी पत्र द्यावे. निकषांची पूर्तता केल्यावरच विद्यापीठाकडून संलग्नीकरण देऊ नये. ५० टक्क्यांपेक्षा कमी विद्यार्थी प्रवेशित झाल्यास मान्यता रद्द समजण्यात येईल, अशा अटी शासन आदेशात आहेत.

नवे पारंपरिक महाविद्यालये नको
पायाभूत सुविधांचा अभाव असलेल्या महाविद्यालयांवर विद्यापीठाद्वारे सुरू असलेल्या कारवाईत हस्तक्षेप केला जाणार नाही, असे उच्च न्यायालयाने आदेशित केले. शासनाने नवीन पारंपरिक महाविद्यालये देणे बंद करावे. एनआयआरएफ रँकिंगमध्ये विद्यापीठाकडे बघण्याचा सामाजिक दृष्टिकोन बदलतो.
-डॉ. विक्रम खिलारे, बामुक्टो संघटना.

या महाविद्यालयांना मिळाली मान्यता: 
- छत्रपती शाहू महाराज कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, सिल्लोड
-केशवराव दादा पडुळ कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, लाडसावंगी
-राजमाता जिजाऊ कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय महाविद्यालय, लिंबे
-मा. बाळासाहेब ठाकरे वरिष्ठ महाविद्यालय, माळी घोगरगाव
-कल्पतरू कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय महाविद्यालय, निमगाव
-श्री छत्रपती वरिष्ठ महाविद्यालय, गारज
-सह्याद्री कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, सावरगाव
-चित्राई महाविद्यालय, आडगाव
-राष्ट्रीय कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, नाचनवेल
-श्री गणपती महाविद्यालय, देवमूर्ती जालना
-छत्रपती संभाजी महाराज महाविद्यालय, रामनगर
-राजमाता जिजाऊ महाविद्यालय, बदनापूर
-स्व. आ. भाऊसाहेब आजबे वरिष्ठ महाविद्यालय, डोंगर किन्ही, बीड
- ॲड. बी. डी. हंबर्डे विधी महाविद्यालय, आष्टी, बीड
-डाॅ. सुभाषराव ढाकणे विधि महाविद्यालय, रोहणवाडी, जालना

Web Title: On the one hand, there will be no admission to traditional courses, addition of 16 new colleges

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.