सासर-माहेरचा मान वाढला; मेहनतीच्या बळावर दोन मुलांची आई झाली PSI, राज्यातून चौथी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2022 01:50 PM2022-04-01T13:50:19+5:302022-04-01T13:53:39+5:30
२०१९ पासून स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू केली. मुलगा जितेश आणि शौर्य या दोन मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष देऊन अभ्यास सुरू केला.
सोयगाव (औरंगाबाद ) : तालुक्यातील कंकराळा येथील माहेर आणि बुलडाणा जिल्ह्यातील चांडोळ येथील सासर असलेल्या रेणुका देवीदास राजपूत (परदेशी) हिने दोन्ही कुटुंबीयांच्या आधाराने व प्रचंड मेहनतीच्या जोरावर यशाचे शिखर गाठले आहे. नुकत्याच लागलेल्या राज्य लोकसेवा आयोगाच्या निकालात पोलीस उपनिरीक्षकपदी तिची नियुक्ती झाली असून, राज्यात चौथा क्रमांकाने उत्तीर्ण होण्याचा बहुमान मिळविला.
कंकराळा (ता. सोयगाव) येथील माहेर असलेल्या रेणुका देवीदास परदेशी हिचा विवाह बुलडाणा जिल्ह्यातील डॉ. विनोद धनावत यांच्याशी दहा वर्षांपूर्वी झाला होता. त्यावेळी रेणुका राजपूत यांनीही वैद्यकीय पदवी घेऊन खासगी वैद्यकीय व्यवसायाचा वसा हाती घेतला. दरम्यान, वैद्यकीय सेवा बजावताना महिलांवर अन्यायाच्या अनेक प्रसंग त्यांनी डोळ्याने पाहिले. त्यामुळे प्रशासकीय अधिकारी होऊन महिलांच्या न्यायहक्कासाठी लढा देण्याचा त्यांनी निश्चय केला. २०१९ पासून स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू केली. मुलगा जितेश आणि शौर्य या दोन मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष देऊन अभ्यास सुरू केला. यावेळी दोन्ही कुटुंबातील सदस्यांनी त्यांना आधार दिला. रेणुका हिने अभ्यासावर अधिकाधिक लक्ष देण्यासाठी घरातील प्रत्येकाने लक्ष दिले. समाजाचे काही तरी देणे लागतो. त्यासाठी अधिकारी होऊन सेवा करण्याचा संकल्प असल्याने रेणुकानेदेखील अभ्यासात सातत्य ठेवले. अखेर २०२२ साली लागलेल्या पोलीस उपनिरीक्षक परीक्षेत त्यांनी चौथा क्रमांक घेऊन यश संपादन केले. त्यांच्या या यशाबद्दल माहेर आणि सासरघरी आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
आजोबांचा गाव विकासाचा आदर्श
माहेरी सुरुवातीपासून समाजसेवा करण्याचा वारसा आहे. रेणुका राजपूत (परदेशी) यांच्या आई, वडील, काका-काकू यांच्याकडून गाव विकासाचे बाळकडू मिळालेले आहे, तर आजोबांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्यांनी लग्नानंतरदेखील अभ्यास करीत यश संपादन केले. असे रेणुका यांचे वडील देवीदास परदेशी यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.