मुख्यमंत्र्यांसाठी दीड लाख राख्या रवाना; ‘उमेद’ महिला, कर्मचारी संघटनेचे लक्षवेधी आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2024 12:54 PM2024-08-19T12:54:24+5:302024-08-19T12:55:49+5:30
ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) हे कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून चालविले जात आहे.
छत्रपती संभाजीनगर : ग्रामीण जीवनोन्नती अभियानाअंतर्गत (उमेद) कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना रविवारी टेम्पोमध्ये दीड लाख राख्या पाठविण्यात आल्या आहेत. ‘उमेद’ महिला व कर्मचारी संघटनेने या माध्यमातून एका दगडात दोन पक्षी मारण्याचा प्रयत्न केला आहे.
ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) हे कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून चालविले जात आहे. उमेद अभियानाने बचत गट, ग्रामसंघ, प्रभागसंघ बांधणीसाठी लक्षणीय काम केले आहे. बचत गटाच्या चळवळीला गती देऊन त्यांच्यात उद्योजकतेची आवड निर्माण केली आहे. त्यामुळे ‘उमेद’ अभियानास शासनाने नियमित विभाग म्हणून मान्यता द्यावी, या अभियानाअंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचारी, अधिकारी आणि समुदाय संसाधन व्यक्तींना सेवेत कायमस्वरूपी सामावून घ्यावे, या मागणीसाठी ‘उमेद’ महिला व कर्मचारी कल्याणकारी संघटनेने ८ जुलै रोजी आझाद मैदान येथे आंदोलन केले होते. शासनाने काही मागण्या मान्य केल्या आहेत. परंतु, ‘उमेद’ अभियानाच्या आस्थापनेस नियमित विभाग म्हणून मान्यता देण्याची मागणी प्रलंबित आहे. त्याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील महिला सक्षमीकरणासाठी ‘लाडकी बहीण’, ‘अन्नपूर्णा योजना’, बचत गटांच्या महिलांच्या खेळते भांडवलामध्ये दुप्पट वाढ, मुलींना उच्च शिक्षणापर्यंतचे शिक्षण मोफत, महिलांना पिंक रिक्षा वाटप करण्याचा निर्णय, महिलांना तिकिटात ५० टक्के मोफत प्रवास आदी योजना लागू केल्या आहेत. त्यामुळे राखी बांधून त्यांचे अभिनंदन करण्याचाही यामागे हेतू आहे, असल्याचे या संघटनेचे संघटनेचे महिला जिल्हाध्यक्ष वंदना जोगदंड व कर्मचारी जिल्हाध्यक्ष सचिन सोनवणे यांनी सांगितले.
पंचायत समितीपासून टेम्पो रवाना
प्रत्येक तालुक्यातून प्राप्त झालेले राख्यांचे बॉक्स एका टेम्पोद्वारे रविवारी दुपारी मुंबईकडे रवाना झाले. त्यांच्यासोबत दुसऱ्या वाहनातून विलास झाल्टे, कृष्णा बनसोडे, राजू सय्यद, श्रीकृष्ण केंद्रे, सखुबाई पवार, हिना शेख, रंजना काकडे, सरला काकडे, सोनाली देशमुख, मीना भगुरे, मनीषा बोराडे, सोनाली मोरे, वंदना जाधव, मुक्ता गाडेकर, राधा जाधव, निर्गुणा सोमदे, सिंधू शिनगारे, पुष्पा बोरणारे, विजया वाणी, प्रतिभा पुरी, वंदना जोगदंड, रेखा बोराडे आदी गेले आहेत.