छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एकाच गावात कुणबी नोंदीचे सापडले दीड हजार पुरावे
By विकास राऊत | Published: November 10, 2023 04:47 PM2023-11-10T16:47:57+5:302023-11-10T16:48:18+5:30
मराठा आरक्षण: निवासी उपजिल्हाधिकारी विधाते यांच्याकडे पुरावे सादर
छत्रपती संभाजीनगर : सिल्लोड तालुक्यातील धानोरा गावात मराठा-कुणबी नोंदीचे एकगठ्ठा सुमारे दीड हजार पुरावे आढळले आहेत. ग्रामस्थांनी त्या पुराव्यांची जंत्री आरक्षण कक्षाचे नोडल अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी जनार्धन विधाते यांना गुरूवारी सादर केली. यावेळी सिल्लोडचे उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण व नागरिकांची उपस्थिती होती. या पुराव्यांमध्ये निजामकालीन महसूल नोंदी आहेत. तलाठी (तत्कालीन पटवारी) यांनी मराठी, उर्दू या भाषेत घेतलेल्या नोंदी आहेत. सातबारा, भूमी अभिलेखांत कुणबी नोंदी आढळल्याचे गावकऱ्यांनी सांगितले.
मराठा आरक्षण आंदोलनानंतर ग्रामीण भागात समाजामध्ये जागृती झाली असून, आता नागरिक स्वत: सर्व जुन्या अभिलेखांचा शोध घेऊ लागले आहेत. महसूल प्रशासनाने मागील दोन महिन्यांत २३ लाख ९ हजार ६६१ अभिलेखांची तपासणी केल्यानंतर जिल्ह्यात कुणबी जातीचा उल्लेख असलेल्या ६८४ नोंदी आढळल्या होत्या. सिल्लोडमधील पुराव्यानंतर आकडा २५०० च्या आसपास जाईल. महसूल अभिलेखात ३३६, शैक्षणिक अभिलेखात २३९, कारागृह अधीक्षक १६, मुद्रांक विभाग, सेवा अभिलेखात प्रत्येकी १, भूमी अभिलेखात ९१ अशा कुणबी जातीच्या ६८४ नोंदी आढळल्या होत्या. ११ विभागातील ४४ प्रकारचे अभिलेखे प्रशासनाने तपासले असून अजूनही शोधमाेहीम सुरू आहे.
कुणबी नोंदी डाऊनलोड करता येणार....
जिल्ह्यात कुणबी प्रमाणपत्र मिळविण्याची प्रक्रिया सोपी करण्यासाठी नोंदीचे पुरावे प्रशासनाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिले आहेत. संकेतस्थळावर सुमारे १ हजार ६५ कुणबी नोंदींची माहिती अपलोड केली आहे. एका क्लिकवर ही माहिती मिळेल. ही माहिती डाऊनलोडही करता येईल. बुधवारपासून ही माहिती सर्वांसाठी उपलब्ध झाल्याचे विधाते यांनी सांगितले. छत्रपती संभाजीनगर तालुक्यात १३७, फुलंब्रीत १३३, कन्नड १२२, खुलताबाद ५३, पैठण २७, सिल्लोड २५, सोयगाव आणि वैजापूर प्रत्येकी २१, तर गंगापूर तालुक्यात ५ दस्त अपलोड केले आहेत. अपलोड केलेल्या नोंदी डाऊनलोड केल्यानंतर त्याची प्रत सेतू सुविधा केंद्रात जात प्रमाणपत्र मिळण्यासाठी करावयाच्या अर्जासोबत जोडावी. त्याची शहानिशा संबंधित कार्यालयाकडून केल्यावर प्रमाणपत्र वितरीत केले जाईल.