समोर दीड वर्षाची मुलगी, पोटात ६ महिन्यांचा गर्भ; सासरच्या जाचाने विवाहितेने संपवले आयुष्य
By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2023 12:05 PM2023-12-15T12:05:07+5:302023-12-15T12:05:13+5:30
विवाहितेचा वडिलांना रात्री कॉल; नंतर काही तासातच संपवले जीवन
छत्रपती संभाजीनगर : पती सतत दारू पिऊन छळ करायचा, लग्नानंतर वारंवार विनंती करूनही त्याचे विवाहबाह्य संबंध थांबले नाहीत. नातेवाइकांच्या मध्यस्थीनंतर हे कृत्य थांबवण्याचे कबूल देखील केले. मात्र, त्रास कमी झालाच नाही. या त्रासाला कंटाळून ६ महिन्यांची गर्भवती असलेल्या अलका पवन मुटकेर (२३) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. बुधवारी मध्यरात्री २ वाजता पती घरी परतल्यानंतर ही घटना निदर्शनास आली.
मूळ बीड जिल्ह्यातील मौजवाडी येथील असलेल्या अलका व टॅक्सी व्यावसायिक पवन यांचे २०२० मध्ये लग्न झाले होते. लग्नाच्या एका वर्षातच पवनने दारू पिऊन मारहाण करणे, विवाहबाह्य संबंध ठेवणे सुरू केले. तेव्हा अलका यांनी त्यांच्या वडिलांना हे सर्व सांगितले. त्याच दरम्यान त्यांना मुलगी झाली. मुलगी झाल्याने पतीच्या वागण्यात सुधारणा होईल, असे वाटत होते. २०२१ मध्ये पवनने सासरच्यांना दोन लाख रुपयांची मागणी केली. मुलीला त्रास नको, म्हणून अलका यांचे वडील प्रभाकर ढेंबरे यांनी हातउसने घेऊन पैसे दिले. मात्र, पवनचा त्रास कमी झाला नाही. त्याला कंटाळून अलका माहेरी निघून गेल्या. नातेवाइकांच्या मध्यस्थीनंतर पवनने विवाहबाह्य संबंध बंद करून त्रास न देण्याचे आश्वासन दिले. त्या अटीवरच प्रभाकर यांनी मुलीला पुन्हा सासरी पाठवले होते.
दुसऱ्यांदा गर्भवती, पण पतीचा विरोध
अलका या दुसऱ्यांदा गर्भवती राहिल्या. मात्र, हे समजताच पतीने बाळ जन्माला घालायला विरोध सुरू केला. अलका गर्भपात न करण्यावर ठाम होत्या. त्यातून त्याने छळ सुरू केला. त्याचे भाऊ अजय व विजयने त्या अवस्थेत देखील अलका यांना स्वयंपाक करायला लावणे, नावे ठेवून टोमणे मारत होते. १३ डिसेंबर रोजी अलका यांनी वडिलांना कॉल करून मला घरी घेऊन जाण्यासाठी तुम्ही मला घ्यायला या, असे सांगितले. गुरुवारी प्रभाकर मुलीला घेऊन जाण्यासाठी येणार होते. मात्र, अलका यांनी रात्रीतून आयुष्य संपवले. काही तासातच वडिलांना मुलीच्या मृत्यूचा कॉल गेला. गुरुवारी सायंकाळी जवाहरनगर ठाण्यात सहायक निरीक्षक दिलीप चंदन यांनी गुन्हा दाखल केला. उपनिरीक्षक रमेश राठोड यांनी तत्काळ पवनसह त्याच्या दोन्ही भावांचा शोध घेऊन अटक केली.