नगररोडवर दीड तास वाहतूक ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2019 11:23 PM2019-05-11T23:23:23+5:302019-05-11T23:23:32+5:30
औरंगाबाद-नगर महामार्गावरील छावणी उड्डाण पुलावर शनिवारी सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास ट्रॅव्हल्स बस नादुरुस्त झाल्याने जवळपास दीड तास वाहतूक ठप्प झाली होती.
वाळूज महानगर : औरंगाबाद-नगर महामार्गावरील छावणी उड्डाण पुलावर शनिवारी सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास ट्रॅव्हल्स बस नादुरुस्त झाल्याने जवळपास दीड तास वाहतूक ठप्प झाली होती. या प्रकारामुळे दोन किलोमिटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
पुणे येथून प्रवासी घेवून जुगनू नावाची ट्रॅव्हल्स बस (एम.एच.०९ - सी.व्ही.९७९) शुक्रवारी रात्री औरंगाबादकडे निघाली होती. बस छावणी उड्डाणपुलाजवळ आल्यानंतर शनिवारी सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास बंद पडली. पुलाच्या मधोमध ही बस बंद पडल्याने महामार्गावरुन ये-जा करणारी वाहने एकाच जागेवर थांबली. विशेष म्हणजे लष्कराच्या हद्दीत ही बस नादुरुस्त झाल्यामुळे लष्कराच्या जवानांनी घटनास्थळ गाठुन वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले.
दरम्यान, बस सुरु होत नसल्यामुळे बसमधील प्रवाशांनी इतर वाहनाने शहर गाठले. वाहतुकीची कोंडी निर्माण झाल्याने लष्करी जवान मारहाण करतील या भितीने बसचालक शेख इब्राहिम हा घटनास्थळावरुन पसार झाला. वाहतुकीच्या कोंडीमुळे या महामार्गावर रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या लांबच-लांब रांगा लागल्या होत्या. या वाहतुकीच्या कोंडीमुळे शहरातून वाळूज एमआयडीसीतील आपल्या कंपन्यात जाणाऱ्या उद्योजक, अधिकारी व कर्मचाऱ्यांनाही मोठा त्रास सहन करावा लागला.