ट्रकमधील दीड लाखाच्या चहापत्तीचे बॉक्स गायब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:02 AM2021-08-20T04:02:17+5:302021-08-20T04:02:17+5:30
:रांजणगाव फाटा येथील घटना; ट्रक चालकावर संशय ट्रकमधील दीड लाखाच्या चहापत्तीचे बॉक्स गायब : रांजणगाव फाटा येथील घटना; ट्रक ...
:रांजणगाव फाटा येथील घटना; ट्रक चालकावर संशय
ट्रकमधील दीड लाखाच्या चहापत्तीचे बॉक्स गायब
: रांजणगाव फाटा येथील घटना; ट्रक चालकावर संशय
वाळूज महानगर : रांजणगाव फाटा येथे उभ्या केलेल्या ट्रकमधील दीड लाख रुपये किमतीचे चहापत्तीचे २४ बॉक्स चोरी झाल्याची तक्रार एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे. या बॉक्स चोरीप्रकरणी ट्रक चालकावर संशय व्यक्त करण्यात आला आहे.
गुजरातमधील वापी येथून इस्ट वेस्ट रोडलाईन्स या ट्रान्सपोर्टच्या चालकाने ट्रकमध्ये (क्रमांक एमएच २८- बीबी- ४२३२) चहापत्तीचे २०९ बॉक्स व दुसऱ्या एका ट्रॉन्सपोर्टचे साहित्य भरुन औरंगाबादला पोहोच करण्याचे सांगितले होते. या ट्रकमध्ये माल भरल्यानंतर ११ ऑगस्टला सायंकाळी ट्रकचालक विनोद कचरू वावळे (रा. बामणी, ता. जिंतूर, जि. परभणी) व ट्रक मालकाचा जावई अमोल बोरकर हे दोघे गुुजरातहून औरंगाबादला येण्यासाठी निघाले होते. दोन दिवसांनी १३ ऑगस्टला ट्रक वाळूज एमआयडीसीत आल्यानंतर चालक वावळे व त्यांच्या सोबत असलेल्या बोरकर यांनी बॅटको कंपनीला माल खाली करून चालक विनोद वावळे हा ट्रक घेऊन रांजणगाव फाट्यावर थांबला, तर अमोल बोरकर हे त्यांच्या ओळखीचे सिद्धार्थ वाढवे यांच्यासोबत कामानिमित्त गेले होते. दोन तासांनी अमोल बोरकर हे रांजणगाव फाट्यावर आल्यानंतर त्यांनी चालकास ट्रकमधील चहापत्तीचे बॉक्स जळगावला पोहोच करायचे असल्याचे सांगितले. मात्र, चालक वावळे यांनी माझ्या एका नातेवाईकाचा मृत्यू झाल्याने त्याने जळगावला जाण्यास नकार दिला. मात्र, मालाची अर्जंट डिलिव्हरी द्यायची असल्याचे बोरकर यांनी चालक वावळे यांची समजूत काढली. यानंतर दोघेही रात्रभर रांजणगाव फाटा येथे आराम करून दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास ते ट्रक घेऊन जळगावला पोहोचले. जळगावला गेल्यानंतर चालक वावळे याने मी शौचास जाऊन येतो, असे म्हणून तो निघून गेल्यानंतर अमोल बोरकर हे ट्रकमधील चहापत्तीचे बॉक्स खाली करू लागले. यावेळी बोरकर यांना ट्रकमधील चहापत्तीचे २४ बॉक्स गायब असल्याचे दिसून आले.
चौकट..........
ट्रकचालकाचा मोबाईल बंद
ट्रकमधील १ लाख ५७ हजार ८१४ रुपये किमतीचे बॉक्स गायब झाल्याने अमोल बोरकर यांनी ट्रकचालक वावळे यास मोबाईलवर संपर्क साधला; त्याचा मोबाईल बंद असल्याने ट्रक चालकानेच हे बॉक्स लांबविल्याचा संशय बोरकर यांना आला. या चहापत्ती बॉक्स चोरीप्रकरणी ट्रक चालक विनोद वाळे याच्याविरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास उपनिरीक्षक चेतन ओगले हे करीत आहेत.
----------------------