उद्योजकाच्या बँक खात्यातून दीड लाख रुपये ऑनलाइन पळविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:02 AM2021-06-06T04:02:11+5:302021-06-06T04:02:11+5:30
प्राप्त माहितीनुसार तक्रारदार ऋषिकेश मोहन चव्हाण (रा. इंद्रप्रस्थ सोसायटी, गारखेडा) यांचा वसमत (जि. परभणी) येथे जैविक खताचा कारखाना आहे. ...
प्राप्त माहितीनुसार तक्रारदार ऋषिकेश मोहन चव्हाण (रा. इंद्रप्रस्थ सोसायटी, गारखेडा) यांचा वसमत (जि. परभणी) येथे जैविक खताचा कारखाना आहे. काही महिन्यांपासून ते औरंगाबादेत राहत आहेत. ४ जून रोजी त्यांनी फेसबुकवर भोज थालीचा मोबाइल क्रमांक मिळविला आणि त्या क्रमांकावर कॉल केला. तेव्हा त्यांचा फोन स्वीकारण्यात आला नाही. मात्र, काही मिनिटांनी त्यांना अनोळखी क्रमांकावरून कॉल आला. तुमची ऑर्डर घेण्यासाठी तुमच्या डेबिट कार्डवरून दहा रुपये पाठवावे लागतील. ही रक्कम तुम्हाला लगेच परत केली जाईल, असे सांगितले. यामुळे चव्हाण यांनी लगेच त्याने दिलेल्या क्रमांकावर ऑनलाइन १० रुपये पाठविले. ही रक्कम पाठविल्यावर त्याने तुमचे पैसे परत करण्यासाठी दोन ओटीपी क्रमांक पाठविले आहेत. ते सांगा, असे सांगितले. त्याच्यावर विश्वास ठेवून चव्हाण यांनी त्या अनोळखी व्यक्तीला ओटीपी क्रमांक सांगितले. यानंतर चव्हाण यांच्या खात्यातून २० हजार १०० रुपये, २५ हजार ९७७ रुपये आणि ४९ हजार ९९९ रुपये परस्पर काढून घेतले. याचे मेसेज तक्रारदार यांना प्राप्त होताच त्यांनी त्या अनोळखी मोबाइलधारकाला कॉल केला असता त्याने ही रक्कम चुकून त्याच्या खात्यात वर्ग झाली. ही सर्व रक्कम तुम्हाला परत करतो, तुम्ही तुमच्या मोबाइलमध्ये anudesk हे ॲप्लिकेशन्स डाउनलोड करा, असे त्याने सांगितले. तक्रारदार यांनी लगेच हे ॲप्लिकेशन डाउनलोड करताच आरोपीने आणखी रक्कम परस्पर काढून फसवणूक केली. हा प्रकार लक्षात येताच चव्हाण यांनी सायबर ठाणे आणि पुंडलिकनगर ठाण्यात धाव घेतली. पोलिसांच्या सल्ल्याने त्यांनी लगेच त्यांच्या मोबाइलमधील anydesk ॲप्लिकेशन डिलिट केले.
=====
आजही भामट्याचे कॉल
तक्रारदार यांच्या खात्यात पैसे असल्याचे समजताच आरोपीने तक्रारदार यांना शनिवारी पुन्हा कॉल करून रक्कम परत करण्याची ग्वाही दिली. आणि anyDesk अप्लिकेशन डाउनलोड करायला सांगितले. त्यांनी त्याला नकार देताच आरोपीने दुसऱ्या क्रमांकावरून कॉल करून तो बँकेचा अधिकारी बोलत असल्याचे म्हणाला. तुमची काल गेलेली रक्कम परत मिळविण्यासाठी ओटीपी पाठवीत आहे, तो ओटीपी क्रमांक सांगा, असे म्हणाला. मात्र, चव्हाण यांनी त्याला आज प्रतिसाद दिला नाही.