दीड दिवसात ‘एसटी’ला दीड कोटींचा फटका
By Admin | Published: December 18, 2015 11:45 PM2015-12-18T23:45:12+5:302015-12-18T23:50:37+5:30
औरंगाबाद : वेतनवाढ व इतर मागण्यांसाठी महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेसतर्फे (इंटक) पुकारण्यात आलेला संप अखेर शुक्रवारी दुपारनंतर मागे घेण्यात आला.
औरंगाबाद : वेतनवाढ व इतर मागण्यांसाठी महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेसतर्फे (इंटक) पुकारण्यात आलेला संप अखेर शुक्रवारी दुपारनंतर मागे घेण्यात आला. दीड दिवसाच्या संपामुळे ‘एसटी’ला औरंगाबाद विभागात सुमारे दीड कोटी रुपयांचा फटका बसला. आंदोलकांनी दोनशेवर गाड्या पंक्चर केल्या होत्या, तर अनेकांची हवा सोडली होती, तर संप मागे घेतल्यानंतर या गाड्यांच्या दुरुस्तीतच अर्धा दिवस गेला. तब्बल ३९ तासांनंतर ‘एसटी’ रस्त्यावर धावू लागल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला.
वेतनवाढीसाठी इंटकतर्फे गुरुवारपासून राज्यभर बेमुदत संप पुकारण्यात आला होता. इतर संघटनांनीदेखील संपाला पाठिंबा दिल्यामुळे एकही ‘एसटी’ रस्त्यावरून धावताना दिसून आली नाही. मागण्या मान्य करण्याचे आश्वासन परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी दिल्यानंतर अखेर शुक्रवारी दुपारी एक वाजता संप मागे घेण्यात आला. ‘एसटी’च्या संपामुळे गुरुवारी प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.
शुक्रवारी मध्यवर्ती बसस्थानक व सिडको बसस्थानकावर तुरळक प्रवासी हजर होते. खाजगी वाहतूकदारांनी प्रवासासाठी दामदुप्पट भाडे आकारून हा संप ‘कॅश’ करून घेतला.