आठ तालुक्यांत दीड हजार उमेदवार रिंगणात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2017 12:24 AM2017-09-28T00:24:38+5:302017-09-28T00:24:38+5:30
जिल्ह्यातील १२६ ग्रा.पं.च्या निवडणुकीमध्ये बुधवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी रात्री १० वाजेपर्यंत हाती आलेल्या वृत्तानुसार जिंतूर तालुका वगळता इतर आठ तालुक्यांमध्ये सदस्य पदासाठी १ हजार ४३९ तर सरपंच पदासाठी २४५ असे १ हजार ६८४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : जिल्ह्यातील १२६ ग्रा.पं.च्या निवडणुकीमध्ये बुधवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी रात्री १० वाजेपर्यंत हाती आलेल्या वृत्तानुसार जिंतूर तालुका वगळता इतर आठ तालुक्यांमध्ये सदस्य पदासाठी १ हजार ४३९ तर सरपंच पदासाठी २४५ असे १ हजार ६८४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत़
गंगखेडमध्ये ११५ उमेदवार रिंगणात
गंगाखेड- तालुक्यातील १३ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी सरपंच पदासाठी १९ तर सदस्य पदासाठी ४५ उमेदवारांनी माघार घेतली़ त्यामुळे आता सरपंच पदासाठी ३७ तर सदस्य पदासाठी १७८ उमेदवार रिंगणात आहेत़
नागठाणा व सिरसम या दोन ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत़ शंकरवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच बिनविरोध झाले आहेत़ घटांग्रा ग्रामपंचायतीमध्ये ९ जागांपैकी ५ जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत़ बेलेवाडी येथे सरपंच पदासह इतर सहा सदस्य बिनविरोध निवडून आले. शंकरवाडी येथे सरपंच पदाचे उमेदवार बिनविरोध निवडून आले असून, सात पैकी ४ जागा बिनविरोध झाल्या आहेत़ रुमणा जवळा ग्रा.पं.त ९ उमेदवारांनी माघार घेतली असून, प्रभाग क्रमांक ३ मधील दोन जागा बिनविरोध आल्या आहेत़ महातपुरी ग्रा.पं.त ४ जागा बिनविरोध झाल्या असून, ९ जागांसाठी २३ उमेदवार रिंगणात आहेत़ नागठाणा ग्रामपंचायतीचे सरपंचपद व ७ सदस्य बिनविरोध झाले आहेत़ सिरसम ग्रामपंचायतीच्या सरपंचासह सर्व सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत़ त्यामुळे आता ९ सरपंचांसाठी ३७ तर सदस्यपदासाठी १७८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत़
मानवत: बहुतांश गावांत थेट लढती
तालुक्यातील ८ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सरपंच पदासाठी १३ तर सदस्य पदासाठी ३२ उमेदवारांनी माघार घेतली. त्यामुळे निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले असून, बहुतांश गावांत दुरंगी लढत होत आहे़ देवलगाव आवचार येथे सरपंच पदासाठी २ तर सदस्य पदाच्या ९ जागांसाठी १९ उमेदवार रिंगणात आहेत़ कोल्हावाडी येथील सरपंचपदासाठी २ तर सदस्य पदाच्या ७ जागांसाठी १५ उमेदवार रिंगणात आहेत़ मानोली ग्रा.पं.मध्ये मांडे गटाचे दोन सदस्य बिनविरोध निवडून आले. उर्वरित सात जागांसाठी १४ उमेदवार रिंगणात आहेत़ सरपंच पदासाठी ३ उमेदवारांत लढत असून, जि़प़ सदस्य विष्णू मांडे यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे़ बाजार समितीचे उपसभापती पंकज आंबेगावकर आणि त्यांचे प्रतीस्पर्धी संतोष जाधव यांनी येथील निवडणुकीत रंगत आणली आहे़ या ठिकाणी सरपंच पदासाठी २ तर सदस्यांच्या ९ जागांसाठी १८ उमेदवार रिंगणात आहेत़ सोनूळा येथे सरपंच पदासाठी २ उमेदवार रिंगणात आहेत़ या ठिकाणी चार सदस्य बिनविरोध झाले आहेत़ उर्वरित ३ जागांसाठी सहा उमेदवार लढतीत आहेत़ वझूर बु़ येथे ८ सदस्य बिनविरोध निवडून आले असून, उर्वरित एका जागेसाठी दोघे रिंगणात आहेत़ सरपंच पदासाठी सरळ लढत आहे़ रत्नापूर येथे सरपंच पदासाठी ३, सदस्यांच्या ७ पदासाठी १४ उमेदवार रिंगणात आहेत़
पाथरी तालुक्यात १३६ उमेदवार
पाथरी- तालुक्यातील ७ ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि सदस्य पदासाठी १३६ उमेदवार रिंगणात आहेत़ बुधवारी सरपंच पदासाठी १९ उमेदवारांनी माघार घेतल्याने १८ उमेदवार रिंगणात आहेत़ तर ५९ सदस्य पदासाठी ४४ उमेदवारांनी माघार घेतली असून, ११८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत़