शहरावर दीड हजार सीसीटीव्हीची नजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2017 01:11 AM2017-07-21T01:11:13+5:302017-07-21T01:14:43+5:30
औरंगाबाद : सेफ सिटीच्या दुसऱ्या टप्प्यात तब्बल दीड हजार सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे सुरक्षा कवच शहराला बसविण्याच्या प्रकल्पाचा शुभारंभ विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते गुरुवारी झाला
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : सेफ सिटीच्या दुसऱ्या टप्प्यात तब्बल दीड हजार सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे सुरक्षा कवच शहराला बसविण्याच्या प्रकल्पाचा शुभारंभ विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते गुरुवारी झाला. याशिवाय पोलिसांचे मोबाइल अॅप, नवीन संकेतस्थळ आणि वाहतूक नियमांविषयी जनसामान्यांमध्ये जागृती घडविण्यासाठी चौकाचौकांत लावण्यात आलेल्या शंभराहून अधिक होर्डिंगचेही औपचारिक उद्घाटन यावेळी करण्यात आले. पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांनी जाहीर केलेल्या संकल्पनेला दोन महिन्यांत मूर्तरूप येण्यास सुरुवात झाली.
पोलीस आयुक्तालयातर्फे शहरात दुसऱ्या टप्प्यात दीड हजार सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यास प्रारंभ, वाहतूक नियमांविषयी जनजागृती करणारे फलक, पोलीस आयुक्तालयाचे नवीन संकेतस्थळ आणि पोलीस न्यूज अॅपचा शुभारंभ विधानसभेचे अध्यक्ष बागडे यांच्या हस्ते गुरुवारी (दि.२०) एमजीएममधील रुख्मिणी सभागृहात करण्यात आला, यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर महापौर भगवान घडमोडे, उपमहापौर स्मिता घोगरे, आ. अतुल सावे, आ. संजय शिरसाट, आ. इम्तियाज जलील, आ. सतीश चव्हाण, आ. सुभाष झांबड, स्थायी समिती सभापती गजानन बारवाल, विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, विशेष पोलीस महानिरीक्षक मिलिंद भारंबे, मनपा आयुक्त डी. एम. मुगळीकर, पोलीस आयुक्त यशस्वी यादव, प्रधान आयकर आयुक्त शिवदयाल श्रीवास्तव, जि.प. सीईओ मधुकरराजे आर्दड, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक डॉ. श्रीकांत परोपकारी, पोलीस उपायुक्त विनायक ढाकणे, डॉ. दीपाली धाटे-घाडगे, राहुल श्रीरामे यांची उपस्थिती होती.
यावेळी भापकर म्हणाले की, चांगले-वाईट काम करणाऱ्यावर देव वरून नजर ठेवतो आणि देव तुम्हाला शिक्षाही देतो, असे आपण म्हणायचो. आता मात्र तुमच्या प्रत्येक गैरकृत्यावर पोलिसांच्या सीसीटीव्ही कॅमऱ्यांची नजर असेल आणि तुम्ही चूक केली तर तुम्हाला सजाही ते देतील. नव्या तंत्रज्ञानामुळे गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालता येतो. या उपक्रमाबद्दल पोलीस आयुक्तांचे त्यांनी कौतुक केले. जिल्हाधिकारी नवल किशोर राम म्हणाले की, अपघातात अनेकांचे प्राण जातात. यामुळे वाहतूक जनजागृतीसाठी पोलिसांनी लावलेले होर्डिंग अत्यंत महत्त्वाचे आहे. जगप्रसिद्ध अजिंठा, वेरूळसह पर्यटनस्थळांना भेटी देण्यासाठी देशविदेशातील लाखो लोक औरंगाबादेत येतात. या शहराचे रस्ते, स्वच्छता आणि सीसीटीव्ही बसविण्याच्या कामासाठी सर्वांचे योगदान आवश्यक आहे. यावेळी महापौर घडामोडे, आ. सावे, आ. जलील, आ. शिरसाट, आ. झांबड यांनी मनोगत व्यक्त केले. यशस्वी यादव यांनी प्रास्तविक केले. डॉ. दीपाली धाटे यांनी आभार मानले.