जनावरे चोरणाऱ्या टोळीच्या म्होरक्यास स्थानिक गुन्हेशाखेकडून अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2019 03:18 PM2019-11-09T15:18:09+5:302019-11-09T15:19:30+5:30
अटकेतील आरोपींकडून गुरे चोरण्यासाठी वापरलेली पिकअप जीप आणि दोन बैल, एक कालवड हस्तगत केले.
औरंगाबाद: ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची गाई, म्हशी आणि वासरे चोरणाऱ्या टोळीतील एका जणाला ग्रामीण स्थानिक गुन्हेशाखा पोलिसांनीअटक केली. अटकेतील आरोपींकडून गुरे चोरण्यासाठी वापरलेली पिकअप जीप आणि दोन बैल, एक कालवड हस्तगत केले.
विनोद भानुदास गायकवाड(२६,रा. वैतागवाडी,गोंदी, ता. अंबड, जि. जालना)असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. स्थानिक गुन्हेशाखेचे निरीक्षक भागवत फुंदे म्हणाले की, ग्रामीण भागातील म्हारोळा येथील रामेश्वर रावसाहेब जाधव यांच्या शेतातील गोठ्यात बांधून ठेवलेले दोन बैल, एक कालवड, एक गाय आणि वासरू चोरीला गेले होते. अशाच पशूधन चोरीचा जाण्याच्या घटना काही दिवसापूर्वी घडल्या होत्या. या गुन्ह्यांचा तपास करीत असताना ही चोरी विनोद गायकवाड आणि त्याच्या साथीदारांनी केल्याची माहिती खबऱ्याने पोलिसांना दिली.
यानंतर वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी संशयित आरोपी विनोदला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता त्याने साथीदारांसह ही चोरी केल्याची कबुली दिली. ही जनावरे वाहून नेत असताना एक गाय आणि वासरू गुदमरून दगावल्याचे सांगितले. ही मृत जनावरे पैठण ते पाचोड रस्त्यावरील लिंबगावफाट्याजवळील रस्त्यालगत टाकून दिल्याची कबुली दिली. यानंतर अन्य दोन बैल, एक कालवड त्याच्याकडून जप्त केली. शिवाय गुन्हा करण्यासाठी वापरेली पिकअप जीप हस्तगत केल्याचे पो.नि. फुंदे यांनी सांगितले. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक भगतसिंग दुलत, कर्मचारी संजय काळे, श्रीमंत भालेराव, दिपेश नागझरे, राहुल पगारे, वाल्मिक निकम, वसंत लटपटे, संजय तांदळे यांनी केली.