कानातील बाळी चोरल्याच्या संशयावरून एकाला मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2019 11:05 PM2019-07-14T23:05:30+5:302019-07-14T23:05:39+5:30
चिमुलकल्याच्या कानातील सोन्याची बाळी चोरल्याच्या संशयावरून नागरिकांनी एका जणाला चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले.
औरंगाबाद : तीन वर्षाच्या चिमुलकल्याच्या कानातील सोन्याची बाळी चोरल्याच्या संशयावरून नागरिकांनी एका जणाला चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले. ही घटना गारखेडा परिसरातील गजानननगर मध्ये रविवारी सायंकाळी घडली. ज्ञानेश्वर मनोहर यादव असे संशयिताचे नाव आहे. विशेष म्हणजे यादव हा नुकताच जेलमधून सुटला होता.
पोलिसांनी सांगितले की, गजानननगर येथील मारुती राजगिरे यांच्या घरातील तीन वर्षीय बालक खेळत होता. सायंकाळी अचानक ज्ञानेश्वर यादव याने घरातील लोकांची नजर चुकवून लहान मुलाच्या कानातील बाळ्या काढून घेतल्या.
हा प्रकार एका नागरीकाने पाहिला आणि त्यांनी चोर, चोर म्हणून आरडाओरड केली. यावेळी यादव पळतच भारतनगरच्या दिशेने जाऊ लागला. यावेळी यादवजवळील सोन्याच्या बाळ्या घेतल्या. यानंतर त्याला बेदम चोप देत पुंडलिकनगर पोलिसांच्या ताब्यात दिले. याविषयी रात्री उशीरापर्यंत गुन्हा नोंद झाला नव्हता.