एक विधानसभा, पाच लोकांना शब्द कसा पाळणार? बॅनरबाजीतून उद्धव ठाकरेंना सवाल

By संतोष हिरेमठ | Published: July 10, 2024 08:04 PM2024-07-10T20:04:44+5:302024-07-10T20:05:24+5:30

छत्रपती संभाजीनगरात उद्धवसेनेतील गटबाजी, नाराजी की विरोधकांचा डाव?

one assembly, how will you keep promise for five people? Question to Uddhav Thackeray from Bannerbaji | एक विधानसभा, पाच लोकांना शब्द कसा पाळणार? बॅनरबाजीतून उद्धव ठाकरेंना सवाल

एक विधानसभा, पाच लोकांना शब्द कसा पाळणार? बॅनरबाजीतून उद्धव ठाकरेंना सवाल

छत्रपती संभाजीनगर : शहरातील अमरप्रित चौकात सोमवारी रात्री ‘एक विधानसभा, ५ लोकांना शब्द कसा पाळणार’ असा सवाल करणारे बॅनर झळकले. उद्धवसेनेतील गटबाजी, विधानसभेसाठी ‘पश्चिम’मधून उमेदवारीसाठी इच्छुकांच्या नाराजीतून हे बॅनर लागले की, ही विरोधकांची खेळी आहे, अशी चर्चा मंगळवारी दिवसभर राजकीय वर्तुळात रंगली होती.

या बॅनरमधून थेट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सवाल करण्यात आला. या बॅनरचा फोटो सामाजिक माध्यमांवर व्हायरल झाला. त्याविषयी एकच चर्चा सुरु झाली. हे बॅनर मंगळवारी मात्र हटविण्यात आले. हे बॅनर नेमके कोणी लावले, हे समजू शकले नाही. बॅनर कोणी लावले, यावरून वेगवेगळ्या चर्चा सुरू होत्या.

काय लिहिले बॅनरवर?
‘कधी तरी शब्द पाळणार का उद्धवजी’, ‘लाेकसभा निवडणूक काढण्यासाठी दिलेला शब्द पाळणार का? उद्धवजी’ आणि ‘एक विधानसभा, पाच लाेकांना शब्द कसा पाळणार उद्धवजी’ असे या बॅनरवर लिहिले होते.

उद्धवसेनेतील इच्छुक
लोकसभेतील पराभवानंतर खैरे हे आमदार संजय शिरसाट यांच्याविरुद्ध ‘पश्चिम’मधून विधानसभेच्या रिंगणात उतरण्यास इच्छुक आहे. उद्धवसेनेचे तालुकाप्रमुख बाळासाहेब गायकवाड, जिल्हा सहसंपर्कप्रमुख विजय साळवे यांच्याकडून उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात येते. मात्र, आता राजू शिंदे यांच्या प्रवेशाने उद्धवसेनेकडून ‘पश्चिम’मधून त्यांनाच विधानसभेची उमेदवारी दिली जाईल, अशीही चर्चा आहे.

शब्द नाही
मातोश्रीवरून कोणालाही असा शब्द दिला जात नाही. मूल्यमापन केले जाते. पक्षश्रेष्ठींचा निर्णय सर्वांना मान्य असतो, मलाही असा काही शब्द दिलेला नाही. हे बॅनर लावण्याचे काम विरोधकांचे असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
- विजय साळवे, जिल्हा सहसंपर्कप्रमुख, शिवसेना (उद्धवसेना)

शब्द नाही, आदेश दिला तर मी लढेन
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कोणालाही शब्द दिलेला नाही. आदेश दिला तर ‘पश्चिम’मधून मी उभा राहील. कारण आमदार संजय शिरसाट यांना विधानसभा निवडणुकीत पाडणे गरजेचे आहे. सध्या जे काही सुरू आहे, ते सर्व उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत जाईल.
- चंद्रकांत खैरे, शिवसेना नेते (उद्धवसेना)

मूल्यमापन करूनच उमेदवारी
पक्षात असा शब्द दिला जात नाही. पक्षात केलेल्या कामाचे मूल्यमापन केले जाते. जो विजयी होऊ शकतो, अशांनाच उमेदवारी दिली जाते. ज्यांचा पक्षाशी, मतदारसंघाशी संबंध नाही किंवा पदावर असूनही सक्रिय नाही, अशा लोकांचा पक्ष विचार करू शकतो का, हाही प्रश्न आहे.
- राजू वैद्य, महानगरप्रमुख, शिवसेना (उद्धवसेना)

Web Title: one assembly, how will you keep promise for five people? Question to Uddhav Thackeray from Bannerbaji

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.