एक तपाच्या तपस्येनंतर बनतात वैदिक, त्यांना प्रतिष्ठा मिळायला हवी

By प्रशांत तेलवाडकर | Published: August 5, 2023 01:45 PM2023-08-05T13:45:17+5:302023-08-05T13:46:24+5:30

४०० वैदिकांच्या मंत्रोच्चाराने संमेलनाला सुरुवात

One becomes a Vedic after 12 yrs hard study, he should get prestige | एक तपाच्या तपस्येनंतर बनतात वैदिक, त्यांना प्रतिष्ठा मिळायला हवी

एक तपाच्या तपस्येनंतर बनतात वैदिक, त्यांना प्रतिष्ठा मिळायला हवी

googlenewsNext

छत्रपती संभाजीनगर : वैद्यकीय शिक्षणपूर्ण करण्यासाठी ५ वर्षे लागतात, अभियांत्रिकीचे शिक्षणासाठी ४ वर्षे लागतात. त्यांच्याकडे समाज सन्मानाने बघत असतो. मात्र, वेदपाठींना वेद मुखोद्गद करण्यासाठी तब्बल १२ वर्षे तपस्या करतात. याच वेदपाठींनी आपले लाखोवर्ष जुनी वैदिक परंपरा मुखोद्गद जतन करून ठेवली आहे. मात्र, अशा वैदिक पंडितांना समाजात पाहिजे तसा सन्मान, प्रतिष्ठा दिली जात नाही. त्यांना यथोचित सन्मान, प्रतिष्ठा मिळण्यासाठीच देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी वैदिक संमेलनाचे आयोजन केल्या जात असल्याची माहिती शारदा पीठामचे महाव्यवस्थापक पद्मश्री डाॅ. व्ही. आर. गौरीशंकर यांनी येथे दिली.

श्री श्री जगद्गुरू शंकराचार्य महासंस्थान, दक्षिणामान्य श्री शारदापीठम् यांच्या वतीने व संत ज्ञानेश्वर वेदविद्या प्रतिष्ठान व श्रीकृष्ण गुरुकुल वेदपाठशाळाच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी ‘वैदिक संमेलना’ला सुरुवात झाली. यावेळी विद्या भारती फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. श्रीनिवास यज्ञसुब्रह्मण्यम यांचीही विशेष उपस्थिती होती. यावेळी महाराष्ट्र व गोवातून आलेल्या ४०० पेक्षा अधिक वैदिकांनी मंत्रोच्चार करीत सप्तपदी मंगल कार्यालयातील संपूर्ण वातावरण मंगलमय केले. यावेळी धर्मपीठावर डॉ. व्ही. आर. गौरीशंकर, यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी सर्वप्रथम ऋग्वेद म्हणजे काय हे सांगत वेदपाठींनी ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद व अथर्ववेदाचे एकानंतर एक मंत्रोघोष करण्यात आला. त्यानंतर वेदपारायणावर व शास्त्रावर चर्चासत्र झाले. वेदपाठींच्या सहभागाने हे चर्चासत्र रंगले होते. स्वागतपर भाषणात वेदमूर्ती दुर्गादास मुळे यांनी सर्व वैदिकांचे स्वागत केले.

तरुणाई वळतिये वेद अध्यायनाकडे
डाॅ. व्ही. आर. गौरीशंकर यांनी सांगितले की, २५ वर्षांपूर्वी बिकट काळ आला होता. मात्र, आता मोठ्या प्रमाणात तरुणाई वैदिक शिक्षणाकडे वळत आहे. वैदिक संमेलनात ४०० वेदपाठी आले त्यातील निम्मे वैदिक हे ३० ते ३५ वर्षे वयोगटातील आहेत.

शोभायात्रेने लक्षवेधले
वैदिक संमेलनाची सुरुवात शोभायात्रेने झाली. जळगावरोडवरील रेणुकामाता मंदिरात पूजाअर्चा करून शोभायात्रा सुरू झाली. यात दोन रथावर वेदमूर्ती विराजमान झाले होते. महिला डोक्यावर कलश घेऊन सहभागी झाल्या होत्या. पारंपरिक वेशभूषेत ५० पेक्षा अधिक बटू शोभायात्रेची शान ठरले.

वेदमूर्तींचा गौरव
वैदिक संमेलनात वेदमूर्तींचा सत्कार करण्यात आला. यात स्वानंद धायगुडे (पुणे), भास्कर जोशी (ढालेगाव), डॉ.अशोक देव (छत्रपती संभाजीनगर), सचिन वैद्य (धाराशिव) व देवदत्तशास्त्री पाटील (गोवा) यांच्या कार्याचा गौरव डाॅ. व्ही. आर. गौरीशंकर यांच्या हस्ते करण्यात आला.

आज संमेलनाचा समारोप
वैदिक संमेलनाचा उद्या शनिवारी अखेरचा दिवस आहे. सकाळी ८:३० वाजेपासून सर्व वेदपारायण व शास्त्र चर्चा, सकाळी ११:३० ते दु १ वा परिसंवाद, चर्चासत्र व दु.३:३० ते सायं ५ वाजेदरम्यान समारोप सत्र.

Web Title: One becomes a Vedic after 12 yrs hard study, he should get prestige

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.