अबब ! एका वसतिगृहाच्या डागडुजीसाठी एक कोटीचा खर्च
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2019 03:43 PM2019-11-12T15:43:21+5:302019-11-12T15:46:04+5:30
केमिकल टेक्नॉलॉजी विभागात काम न करताच बिल उचलले
- राम शिनगारे
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील विविध विभागांत ‘नॅक’च्या मूल्यांकनाच्या नावाखाली केलेल्या उधळपट्टीच्या सुरस कथा समोर येत आहेत. विद्यापीठातील छत्रपती शिवाजी महाराज वसतिगृह क्रमांक-१ च्या दुरुस्तीसाठी तब्बल १ कोटी ८ लाख ४६ हजार ६०८ रुपये खर्च करण्यात आले. या प्रस्तावित दुरुस्तीमध्ये रस्ता, कुंपण आणि डागडुजीच्या कामाचा समावेश असून, त्यासाठी ६५ लाख २५ हजार २८३ रुपये खर्चाला मंजुरी दिली होती. त्यात वाढ होऊन ते काम कोटीच्या पुढे गेले आहे.
'मंजुरी १० लाख रुपयांची,दिले ९३ लाख'; विद्यापीठात कोट्यावधींची उधळपट्टी उघड
विद्यापीठातील छत्रपती शिवाजी महाराज वसतिगृह क्रमांक-१ दुरुस्तीची मागणी अनेक दिवसांपासून होत होती. त्यास विद्यापीठाच्या ‘नॅक’च्या मूल्यांकनापूर्वी मुहूर्त लागला. १७ मार्च २०१८ रोजी झालेल्या इमारत आणि बांधकाम समितीच्या बैठकीत मुख्य रस्त्यापासून वसतिगृहापर्यंत रस्ता, वसतिगृहाला कुंपण आणि वसतिगृहातील खोल्यांची दारे, खिडक्यांची डागडुजी करण्याच्या कामास मंजुरी देण्यात आली. यासाठी ६५ लाख २५ हजार २८३ रुपये एवढा निधी लागणार होता. मात्र ‘नॅक’चे मूल्यांकन झाल्यानंतर दोन महिन्यांनी तत्कालीन कुलगुरूंचा कार्यकाळ पूर्ण होण्याच्या सात दिवस अगोदर इमारत आणि बांधकाम समितीच्या बैठकीत तब्बल १ कोटी ८ लाख ४६ हजार ६०८ सुधारित रकमेला मान्यता देण्यात आली. या कंत्राटदारांची बिलेही तात्काळ अदा करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. वसतिगृहाची करण्यात आलेली कामेही अतिशय निकृष्ट दर्जाची असून, सहा महिन्यांच्या कालावधीमध्येच खराब झाली असल्याचे ‘लोकमत’च्या पाहणीत समोर आले आहे.
केमिकल टेक्नॉलॉजी विभागात कागदोपत्री काम
विद्यापीठातील तंत्रज्ञान विभागात अॅनिमल हाऊस उभारण्यासाठी ९ लाख ५९ हजार ६०० रुपयांची मंजुरी दिली होती. मात्र, या विभागात एक साधे हाऊस उभारले असून, त्यात कोणत्याही प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या नाहीत. मात्र, ९ लाख ५९ हजार ६०० रुपयांची सुुरुवातीची मान्यता असताना त्यावर ३७ लाख २४ हजार ८१० रुपये खर्च केल्याची माहिती समोर आली आहे. या विभागाचे प्रमुख तथा प्रकुलगुरू डॉ. प्रवीण वक्ते हेसुद्धा या कामापासून आणि झालेल्या खर्चापासून अनभिज्ञ असल्याची माहिती त्यांनीच व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत सांगितली असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. त्यामुळे ही कामे बांधकाम विभागाच्या आशीर्वादाने कागदोपत्रीच झाल्याचे स्पष्ट होत आहे.
बांधकाम, वित्त विभागातील अधिकाऱ्यांचे संगनमत
विद्यापीठातील बांधकाम विभागातील अधिकारी आणि वित्त विभागातील एका अधिकाऱ्याच्या संगनमतातून आणि तत्कालीन वरिष्ठांच्या मर्जीने ‘नॅक’च्या कामातील दर तब्बल दहापट वाढविण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. यातील अनेक कामे केवळ कागदोपत्रीच करण्यात आली असून, त्याची बिले काढण्याची जबाबदारी ही वित्त विभागातील एका अधिकाऱ्याने पार पाडल्याचे समोर येत आहे. यात विशेष म्हणजे तत्कालीन कुलगुरूंच्या शेवटच्या काही दिवसांमध्ये वित्त व लेखाधिकारी चुकीची कामे करावी लागतील म्हणून सुटीवर गेले होते, हे विशेष.
रंगरंगोटीत व्यवस्थापन परिषद सदस्याचा हात
विद्यापीठात रंगरंगोटीवर करण्यात आलेल्या कोट्यवधीच्या उधळपट्टीमध्ये एका नेमणूक केलेल्या व्यवस्थापन परिषद सदस्याचा हात असल्याची चर्चा सुरू आहे. प्रशासकीय इमारतीसह इतर इमारतींना रंग देण्याचे काम या सदस्याच्या आग्रहाखातरच त्यांच्या जवळच्या मित्राला देण्यात आले होते. यात विशेष म्हणजे १० लाख रुपयांची मान्यता असताना ९३ लाख रुपयांचे बिल उचलण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. याशिवाय याच सदस्याच्या दबावामुळे संशयास्पद बिले अदा करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.