परीक्षेच्या एक दिवस अगोदर केंद्र बदलले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2019 10:57 PM2019-04-24T22:57:45+5:302019-04-24T22:58:22+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील परीक्षा विभागाचा गोंधळ पुन्हा एकदा समोर आला आहे. विद्यापीठातर्फे संलग्न महाविद्यालयातील विधि अभ्यासक्रमाच्या परीक्षांना गुरुवारपासून सुरुवात होणार आहे. यास एक दिवसाचा अवधी बाकी असताना परीक्षा केंद्र बदलण्यात आले आहेत. प्रत्येक परीक्षेच्या सुरुवातीला परीक्षा केंद्र बदलण्याची परंपरा यावेळीही कायम राहिली आहे.
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातीलपरीक्षा विभागाचा गोंधळ पुन्हा एकदा समोर आला आहे. विद्यापीठातर्फे संलग्न महाविद्यालयातील विधि अभ्यासक्रमाच्या परीक्षांना गुरुवारपासून सुरुवात होणार आहे. यास एक दिवसाचा अवधी बाकी असताना परीक्षा केंद्र बदलण्यात आले आहेत. प्रत्येक परीक्षेच्या सुरुवातीला परीक्षा केंद्र बदलण्याची परंपरा यावेळीही कायम राहिली आहे.
विद्यापीठातर्फे दुसऱ्या टप्प्यातील परीक्षांना गुरुवारपासून सुरुवात होत आहे. यात विधिसह बी.एड., एम.कॉम. आदी अभ्यासक्रमांचा समावेश आहे. परीक्षेच्या आदल्या दिवशी सायंकाळी ६ वाजता परीक्षा केंद्र बदलण्यात आल्याचे परिपत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर टाकण्यात आले आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये ऐनवेळी गोंधळ उडाला. याविषयीची तक्रार मराठवाडा लॉ कृती समितीतर्फे करण्यात आली आहे. औरंगाबाद शहरातील विवेकानंद महाविद्यालयात एलएल.बी. प्रथम ते तिसरे वर्ष (तीन वर्षे कोर्स) या अभ्यासक्रमाचे अद्याक्षर ए ते एम क्रमांकाचे विद्यार्थी परीक्षा देणार होते. मात्र, बदल करण्यात आलेल्या परीक्षा केंद्रानुसार या महाविद्यालयातील सर्वच विद्यार्थी डॉ. आंबेडकर विधि महाविद्यालयात परीक्षा देतील. या विद्यार्थ्यांना हे केंद्र देण्यात आले आहे, तसेच डॉ. आंबेडकर विधि महाविद्यालयात परीक्षा क्रमांक आलेले याच अभ्यासक्रमाचे एन ते झेड अद्याक्षराचे विद्यार्थी व्ही.एन. पाटील विधि महाविद्यालयात परीक्षा देतील, असे परिपत्रकात म्हटले आहे. याशिवाय उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम येथील शंकरराव पाटील महाविद्यालयातील बी.एड. अभ्यासक्रमाचे परीक्षा केंद्र बदलून कै. महारुद्र (बप्पा)मोटे अध्यापक महाविद्यालय गिरवली आणि राजीव गांधी अध्यापक महाविद्यालय, चिंचोली फाटा याठिकाणी देण्यात आले आहे. बीड शहरातील तुलसी संगणशास्त्र व माहिती तंत्रज्ञान महाविद्यालयातील परीक्षा केंद्र बदलून महाराष्ट्र इन्स्टिट्यूट आॅफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी याठिकाणी देण्यात आले आहे.
कोट,
काही तांत्रिक अडचणींमुळे परीक्षा केंद्रे बदलण्यात आली आहेत. काही ठिकाणी संबंधित महाविद्यालयाच्या प्रशासनाने विद्यार्थी संख्या कमी करण्याची मागणी केली होती. या सगळ्याचा विचार करून हा बदल करण्यात आला आहे.
-डॉ. प्रताप कलावंत, उपकुलसचिव, परीक्षा विभाग