दिवसभर एकच चर्चा, तुकाराम मुंढे कुठपर्यंत आले? आरोग्य कर्मचाऱ्यांना भरली धडकी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2022 05:19 PM2022-10-21T17:19:00+5:302022-10-21T17:19:29+5:30
‘साहेब कुठपर्यंत आले...?’ अशीच विचारणा आरोग्य कर्मचारी उशिरापर्यंत एकमेकांना करीत होते.
औरंगाबाद :आरोग्य सेवा आयुक्त तुकाराम मुंढे हे गुरुवारी औरंगाबादेत येणार असल्याची माहिती आरोग्य अधिकारी-कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचली आणि सर्वांना एकच धडकी भरली. ते नगरहून निघाले, औरंगाबादेत पोहोचले, आमखास मैदान परिसरातील नेत्र विभागाची, जिल्हा रुग्णालयाची पाहणी करणार, अशीच चर्चा दिवसभर सुरू होती.
‘साहेब कुठपर्यंत आले...?’ अशीच विचारणा आरोग्य कर्मचारी उशिरापर्यंत एकमेकांना करीत होते. मुंढे यांनी काही दिवसांपूर्वीच आरोग्य सेवा आयुक्त आणि राष्ट्रीय आरोग्य अभियान संचालकपदाचा कार्यभार स्वीकारला. पदभार घेताच मुंढे यांनी कामकाजाचा आणि शिस्तीचा धडाका सुरू केला आहे. २० आणि २१ ऑक्टोबर रोजी औरंगाबादेत भेट देणार असल्याचे पत्र सामाजिक माध्यमांतून आरोग्य कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचले. मुंढे हे अहमदनगरला असून, ते औरंगाबादेत येणार असल्याच्या शक्यतेने जिल्हा सामान्य रुग्णालय, आमखास मैदान येथील नेत्र विभागात आरोग्य कर्मचारी सतर्क होते. स्वच्छतेपासून तर प्रत्येक कर्मचारी आपापल्या कामाच्या ठिकाणी हजर असेल, यावर अधिक भर देण्यात आला. मात्र, सायंकाळी उशिरापर्यंत तुकाराम मुंढे आले नव्हते.
आजही अलर्ट
तुकाराम मुंढे हे शुक्रवारीदेखील येण्याची शक्यता गृहीत धरून आरोग्य यंत्रणा अलर्ट ठेवण्यात येत आहे. त्यांच्या संभाव्य दौऱ्यात कोणतीही त्रुटी निघणार नाही आणि कोणावरही कारवाईची वेळ येणार नाही, यादृष्टीने प्रत्येक गोष्टीकडे बारकाईने लक्ष दिले जात आहे.