एक होत नाही, तोच दुसऱ्या अंत्यविधीसाठी फोन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:04 AM2021-03-19T04:04:12+5:302021-03-19T04:04:12+5:30
औरंगाबाद : कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या एकाचा अंत्यसंस्कार करत नाही, तोच दुसऱ्या अंत्यविधीसाठी फोन येतो, त्यानंतर तिसरा, चौथा....दिवसभर फोन वाजतच ...
औरंगाबाद : कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या एकाचा अंत्यसंस्कार करत नाही, तोच दुसऱ्या अंत्यविधीसाठी फोन येतो, त्यानंतर तिसरा, चौथा....दिवसभर फोन वाजतच आहेत. मृतदेहावर अंत्यविधी करण्याचे पुण्य मिळत आहे, पण हे मृत्यूचे विदारक चित्र पाहावले जात नाही. आताही एका अंत्यविधीसाठी निघालो आहोत, या भावना आहेत, कोरोनाग्रस्ताच्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणाऱ्यांच्या.
जिल्ह्यात कोरोनामुळे बुधवारी १८ जणांचा मृत्यू झाला तर गुरुवारी सायंकाळपर्यंत १६ जणांचे मृत्यू झाल्याचे समोर आले. कोरोनामुळे मृत रुग्णांवर पंचशील महिला बचतगट व मोईन मस्तान ग्रुपच्या माध्यमातून सर्वधर्मिय अंत्यसंस्कार केले जातात. जिल्ह्यात गतवर्षी ऑगस्टमध्ये एका दिवसांत १४ रुग्णांचा मृत्यू झाला; परंतु गेल्या दोन दिवसांपासून मृत्यूच्या संख्येने उच्चांक गाठला आहे. या सगळ्यात अंत्यविधीसाठी या दोन सामाजिक संस्थांचे सदस्य धावपळ करत आहे. सध्या ऊन तापू लागले आहे. अशा तापलेल्या वातावरणात पीपीई कीट घालून अंत्यविधी केले जात आहे. पूर्वी नातेवाईक येण्याचे धाडस करत नसत, पण सध्या स्मशानभूमीत नातेवाईक येत असल्याचे या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
दोन दिवसांपासून धावपळ
गेल्या दोन दिवसांपासून एक अंत्यविधी करत नाही, तोच इतर रुग्णालयांतून फोन येत आहे. अंत्यविधीसाठी आवश्यक परवानगीची प्रक्रिया नातेवाईकांना करावी लागते. ही परवानगी मिळताच अर्धा ते एक तासात अंत्यविधी होतो. काल १२ आणि आज ९ अंत्यविधी केले.
- मोईन मस्तान,मस्तान ग्रुप
---
रात्रीच घरी जातो
कोरोनाने मृत रुग्णांच्या अंत्यविधीसाठी २४ तास सेवा दिली जात आहे. मागच्या वर्षी एका दिवशी जेवढे अंत्यविधी होत, त्या तुलनेत गेल्या दोन दिवसांत अधिक अंत्यविधी केले. रात्रीच घरी जात आहे.
-मिलिंद म्हस्के, पंचशील महिला बचतगट