गुन्हा एका टोकाला, दाखल दुस-या टोकाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2017 12:46 AM2017-10-31T00:46:03+5:302017-10-31T00:46:14+5:30
पोलीस ठाण्यामध्ये न जाता आता आॅनलाईन तक्रार करता येईल़ मात्र गुन्हा घडला तेथे तपासासाठी पोलिसांना जावेच लागणार आहे़ तालुक्यातील अनेक गावे विरूद्ध दिशेच्या पोलीस ठाण्यास जोडलेली आहेत़ गाव व ठाण्यातील अंतर तब्बल ४० कि़मी़ असल्यामुळे पोलीस व जनतेतील संवाद कमी झाला़ परिणामी घडलेल्या गुन्ह्याची माहिती पोलिसांना लवकर मिळणे कठीण जात आहे़
सुनील चौरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
हदगाव : पोलीस ठाण्यामध्ये न जाता आता आॅनलाईन तक्रार करता येईल़ मात्र गुन्हा घडला तेथे तपासासाठी पोलिसांना जावेच लागणार आहे़ तालुक्यातील अनेक गावे विरूद्ध दिशेच्या पोलीस ठाण्यास जोडलेली आहेत़ गाव व ठाण्यातील अंतर तब्बल ४० कि़मी़ असल्यामुळे पोलीस व जनतेतील संवाद कमी झाला़ परिणामी घडलेल्या गुन्ह्याची माहिती पोलिसांना लवकर मिळणे कठीण जात आहे़
मोबाईल, इंटरनेटने जग जवळ आले आहे़ असे असले तरीही हदगाव तालुक्यातील अनेक गावांत कोणत्याही कंपनीचे नेटवर्क चालत नाही़ डोंगराळ व दुर्गम भागात गेल्याशिवाय संवाद होत नाही़ बैठकीचा निरोप चार दिवस अगोदर द्यावा लागतो़ तेव्हा कुठे गावचे सरपंच पोलीस पाटील, तंटामुक्त अध्यक्ष बैठकीला ठाण्यामध्ये उपस्थित राहू शकतात़ हळेगाव असेच एक दुर्गम व डोंगराळ भागातील गाव़ मागील आठवड्यात १३ क्विंटल गांजा याच गावातून जप्त करण्यात पोलिसांना यश आले़ हे गाव तामसा पोलीस ठाण्यापासून १० कि़मी़ अंतरावर आहे़ मात्र या गावाला मनाठा पोलीस ठाणे जोडण्यात आले़ मनाठा पोलिसांचा या गावात संपर्क नाही़ या गावाला जवळची बाजारपेठ तामसा आहे़ खरटवाडी, माळेगाव, शेंदण, जांभळा, ठाकरवाडी, रावणगाव, नाव्हा ही गावे तामसा पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर आहेत़ मात्र गंमत अशी की, ४० कि़मी़ लांब असलेल्या मनाठा ठाण्याला ही गोव जोडण्यात आली़
हदगाव तालुक्यात एकूण ३ पोलीस ठाणी आहेत़ मनाठा, तामसा, हदगाव ठाण्यांतर्गत १४५ गावांच्या संरक्षणाची जबाबदारी संबंधित ठाण्यावर आहे़ एका ठाण्यांतर्गत ३८ ते ४० गावे येतात़ मात्र ही गावे ठाण्याच्या लगतची नसून अगदी विरूद्ध टोकाची आहेत़ निजामाच्या काळात ठाण्यांची निर्मिती झाली आहे़ नदीच्या प्रवाहावरून गावच्या हद्दी ठरवण्यात आल्या होत्या़ तीच पद्धत आजही सुरू आहे़ गुन्हा घडल्यानंतर आरोपी पळून जावू नये, पोलिसांना लवकर माहिती मिळणे गरजेचे आहे़घटनास्थळी पोहोचेपर्यंत गुन्हा घडून एखाद्याचा मृत्यू, अपघात, जळीतकांड अशा घटना घडतात़ अंतर लांब असल्याने पोलिसांनाही तेथे जाण्यास वेळ लागतो़ यामुळे तपासामध्येही अडथळे येतात़ गाव पुढारी अशा घटनांचे स्वत:च्या फायद्यासाठी श्रेय लाटतात़ गुन्हेगार सुटले तरी चालतील मात्र चांगल्या माणसावर अन्याय होवू नये असे कायदा सांगतो़ मग सामान्य माणसाच्या संरक्षणासाठी, त्याच्या कल्याणासाठी ठाण्यातंर्गत येणारी गावे त्याच ठाण्यांना जोडून कायदा व सुव्यवस्था व्यवस्थित करता येईल, हे पुढाºयांनी लक्षात घेतले पाहिजे़