मुले पळविणारे समजून बेदम मारहाण झालेल्या बहुरुप्याचा उपचारा दरम्यान मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2018 12:14 PM2018-06-29T12:14:12+5:302018-06-29T12:18:19+5:30
मुले पळविणारे समजून १५ जून रोजी पडेगाव परिसरातील कासंबरी दर्गा परिसरात बेदम मारहाण झालेल्या दोन बहुरुप्यांपैकी एकाचा गुरुवारी रात्री येथील घाटी रुग्णालयात मृत्यू झाला.
औरंगाबाद : मुले पळविणारे समजून १५ जून रोजी पडेगाव परिसरातील कासंबरी दर्गा परिसरात बेदम मारहाण झालेल्या दोन बहुरुप्यांपैकी एकाचा गुरुवारी रात्री येथील घाटी रुग्णालयात मृत्यू झाला.
चोर आणि मुले पकडणारे समजून शेकडो लोकांनी दोन बहुरूप्यांना बेदम मारहाण केली. मारहाण होत असताना दोघेही ‘आम्ही बहुरूपी आहोत’, असे ओरडून सांगत होते. मात्र, कोणीही त्यांच्यावर विश्वास ठेवायला तयार नव्हते. येईल तो प्रत्येक नागरिक त्यांना एक-दोन फटके देत होता. यामुळे दोघेही रक्तबंबाळ झाले होते. पोलिसांनी मोहननाथ भैरूनाथ सोडा (३८) आणि विक्रमनाथ लालूनाथ भाटी (३५, दोघे रा. हर्सूल सावंगी, मूळ रा. मध्यप्रदेश) या दोघांची सुटका करून त्यांना घाटी रुग्णालयात दाखल केले होते.
( अफवांचे पेव कधी थांबणार; औरंगाबादेत चोरी आणि अपहरणाच्या संशयावरून दोन युवकांना बेदम मारहाण )
यापैकी मोहननाथ यांची प्रकृती चिंताजनक होती व त्यांच्यावर अतीव दक्षता कक्षात उपचार सुरु होते. गुरुवारी रात्री मोहननाथ सोडा यांचा मृत्यू झाल्याची माहिती घाटी रुग्णालयातून मिळाली. या प्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल होणार आहे. चोर आल्याच्या अफवेचा औरंगाबाद जिल्ह्यातील हा तिसरा बळी आहे. यापूर्वी वैजापूर येथील घटनेत दोघांचा मृत्यू झाला होता.