लासूर स्टेशनमध्ये उभारले शंभर बेडचे कोविड रुग्णालय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:02 AM2021-05-01T04:02:16+5:302021-05-01T04:02:16+5:30
कोरोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणामुळे सरकारी यंत्रणेसह खाजगी दवाखानेही कोरोना रुग्णांनी फुल झाले आहेत. लासूर स्टेशन येथील आरोग्य केंद्रातही ...
कोरोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणामुळे सरकारी यंत्रणेसह खाजगी दवाखानेही कोरोना रुग्णांनी फुल झाले आहेत. लासूर स्टेशन येथील आरोग्य केंद्रातही कोरोना रुग्णांच्या दृष्टीने सुविधा अपुऱ्या पडत होत्या. यामुळे येथील रुग्णांना इतरत्र हलवावे लागत होते. यात उपचाराअभावी काही रुग्णांचा मृत्यू झाल्याच्या घटनाही घडल्या. कोरोनाग्रस्त नागरिकांची ससेहोलपट होऊ नये, यासाठी आ. प्रशांत बंब यांनी अवघ्या दहा दिवसांत दिगंबर जैन मंगल कार्यालयात शंभर ऑक्सिजन बेडचे रुग्णालय उभारले आहे. यात २० आयसीयू बेड, ५ व्हेंटिलेटर, ४ बाय पॅप, एक्स-रे, ईसीजी मशीन अशा सुविधा याठिकाणी उपलब्ध करून दिल्या आहेत. या हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन कमी पडू नये यासाठी ऑक्सिजन निर्मिती प्लांट उभारण्यात आला आहे. रुग्णांना सकाळी चहा, नास्त्यापासून दोन वेळचे जेवण मोफत दिले जाणार आहे. डॉ. रणजित गायकवाड, डॉ. सचिन शिहरे आदींच्या मार्गदर्शनाखाली अनेक तज्ज्ञ अनुभवी डॉक्टरांच्या उपस्थितीत या दवाखान्याचे काम चालणार असल्याचे आ. बंब यांनी सांगितले.
चौकट
औषधी, लॅबचा खर्च रुग्णांना करावा लागणार
आ. प्रशांत बंब यांच्या प्रयत्नातून लासूर स्टेशन येथे उभारण्यात आलेल्या दिगंबर जैन मंगल कार्यालयातील शंभर ऑक्सिजन बेडच्या रुग्णालयात कोरोना रुग्णांना बेडसह जेवण मोफत आहे. मात्र, उपचारासाठी लागणारी सर्व औषधी रुग्णांना बाहेरून विकत आणावी लागणार आहे, तसेच लॅब तपासणीसाठीही पैसे माेजावे लागणार असून, त्यात रुग्णांना सवलत दिली जाणार आहे.
फोटो : लासूर स्टेशन येथे उभारण्यात आलेल्या शंभर ऑक्सिजन बेडचे शुक्रवारी उद्घाटन करण्यात आले.
300421\rameshwar_img-20210430-wa0065_1.jpg
लासूर स्टेशन येथे उभारण्यात आलेल्या शंभर ऑक्सिजन बेडचे शुक्रवारी उद्घाटन करण्यात आले.