आशा वर्कर्स व गटप्रवर्तकांच्या संपास शंभर टक्के प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2021 05:27 PM2021-06-15T17:27:10+5:302021-06-15T17:27:36+5:30
एका शिष्टमंडळाने विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन सादर केले.
औरंगाबाद: आशा व गट प्रवर्तक यांच्या आजपासून सुरू झालेल्या बेमुदत संपास शंभर टक्के प्रतिसाद मिळाला.जिल्ह्यातील सर्वच्या सर्व २४०० आशा वर्कर्स व गटप्रवर्तक या संपात सहभागी झाले आहेत.
कोरोना काळात नियमित कर्मचाऱ्याप्रमाणे राबविले जात आहे. परंतु, त्यांना योग्य मोबदला दिला जात नाही. उलट त्यांना अधिकारी काढून टाकण्याची धमकी देतात तर सर्वेक्षणाला गेल्यावर अनेकदा त्यांच्या वर हल्लेही झाले आहेत, याचा निषेध या संपाव्दारे करण्यात येत आहे. आशा वर्कर्स व गटप्रवर्तकांना किमान वेतन देण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी राज्यभरात हा संप सुरू झाला आहे. कोविड काळात सक्षम व समर्थपणे सेवा देणाऱ्या या कामगारांना कोविड योध्दा म्हणून गौरविण्यात आले. मात्र, त्यांना गरजेपुरताही मोबदला दिला जात नाही, असे सीटू प्रणित आशा वर्कर्स संघटनेच्या नेत्या कॉ. मंगल ठोंबरे यांनी सांगितले.
सीटू भवन, अजबनगर येथे सकाळपासूनच आशा वर्कर्स व गटप्रवर्तक एकत्रित जमले होते. नंतर एका शिष्टमंडळाने विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन सादर केले. आशा व गट प्रवर्तकांना शासकीय सेवेत सामावून घ्यावे व किमान २२०००रू वेतन द्यावे अशी आग्रहाचघ मागणी निवेदनात करण्यात आली आहे. कॉ. दामोदर मानकापे, कॉ. लक्ष्मण साक्रुडकर, कॉ. पुष्पा सिरसाट, मिरा जाटवे, पुष्पा पैठणे, संगीता जोशी, पुष्पा काळे, सुनिता दाभाडे, सुवर्णा सिरसाट आदी या संपाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेत आहेत.