सुपारी मारुती मंदिरात एक, कळसावर मात्र २४ अंजनीसूत; शिवाजी महाराजांनी घेतले होते दर्शन
By प्रशांत तेलवाडकर | Published: April 6, 2023 12:01 PM2023-04-06T12:01:04+5:302023-04-06T12:04:34+5:30
हनुमान जयंती विशेष : निजाम सरकार या मंदिराला दिवाबत्तीसाठी त्याकाळात १ आणा देत.
छत्रपती संभाजीनगर : शहराच्या हृदयस्थानी असलेले ग्रामदैवत सुपारी मारुती मंदिर. हे मंदिर माहीत नाही, असा शहरवासी सापडणे दुर्मिळच. मात्र, या मंदिराच्या रक्षणासाठी २४ हनुमान दिवसरात्र येथे खडा पहारा देत आहेत, असे म्हटल्यास तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल. मग तुम्ही म्हणाल आम्हाला कसे दिसले नाही हे हनुमंत, तर या मंदिराच्या कळसावर चारही बाजूला मिळून २४ हनुमान मूर्तीरूपात विराजमान आहेत.
सुपारी मारुतीच्या मूर्तीचा इतिहास चारशे वर्षांचा आहे. त्यावेळेस या परिसरात सुपारीचा मोठा व्यवसाय होता. पुजारी परिवारातील पूर्वजांना त्यावेळेस सुपारीच्या आकारात मारुती दिसला. त्यांनी ती सुपारी पिंपळाच्या झाडाच्या बुंध्याला ठेवली व त्याची पूजा करणे सुरू केले. त्यावर शेंदुराचे थरावर थर चढत गेले व आज ही मूर्ती साडेतीन फुटांची झाली. पूर्वी येथे सागवानी लाकडाचे मंदिर होते. मात्र, २००१ मध्ये या मंदिराचा जीर्णाेद्वार झाला. मुख्य विश्वस्त स्व.विजय पूजारी यांच्या मार्गदर्शनाखाली आंध्र प्रदेशातील कारागीर व्यंकटेश्वर राव यांच्यासह २७ कारागिरांच्या पथकाने मंदिर बांधले. कळसावर समोरील बाजूने रामपंचायतन व पाठीमागील बाजूस शंकर पंचायतन आपणास दिसते. मंदिराच्या चारही बाजूने हनुमानाच्या विविध भावमुद्रेतील हनुमान मूर्ती बसविण्यात आल्या. पूर्व बाजूच्या मुख्य दरवाजाच्या वर ५ हनुमान मूर्ती, दक्षिण बाजूस ७ मूर्ती, पश्चिम बाजूला २ मूर्ती तर उत्तर बाजूला १० मूर्ती अशा २४ हनुमानाच्या मूर्तींचे दर्शन होते. त्यातही हनुमान बैठकीतील मूर्ती, ध्यानस्थ मूर्ती, राम-लक्ष्मणाला खांद्यावर घेतलेली मूर्ती, तीनमुखी हनुमान, पंचमुखी हनुमान, द्रोणगिरी पर्वत हातात घेऊन आकाशातून प्रवास करणारा हनुमान अशा विविध प्रकारच्या मूर्ती येथे आहेत. शेकडो भाविक या मंदिरात दर्शन घेण्यासाठी येतात मात्र, यातील खूप कमी भाविकांनी कळसावरील या मूर्तींकडे पाहिले आहे.
निजाम सरकार दिवाबत्तीला देत १ आणा
या मंदिराचे विश्वस्त रवींद्र पूजारी यांनी सांगितले की, निजाम सरकार या मंदिराला दिवाबत्तीसाठी त्याकाळात १ आणा देत. येथे आग्र्याला जाताना छत्रपती शिवाजी महाराजांनी सुपारी मारुतीचे दर्शन घेतले. त्यानंतर लोकमान्य बाळगंगाधर टिळक, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी या मंदिरात येऊन मारुतीचे दर्शन घेतले आहे.